अराजपत्रित पदांची पद भरती अखेर 'महाआयटी'कडेच; मनसे विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:47 IST2020-08-18T12:28:59+5:302020-08-18T19:47:00+5:30
महापरीक्षा पोर्टल च्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती.

अराजपत्रित पदांची पद भरती अखेर 'महाआयटी'कडेच; मनसे विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश
पुणे : महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती. यामुळे राज्यातील तरुण अस्वस्थ होते. म्हणूनच याबाबत राज्यसरकारकडे वारंवार पाठपुरावा मनविसेकडून करण्यात येत होता. अराजपत्रित पदांमध्ये, पोलीस भरती, शिक्षक सेवक भरती, अंगणवाडी सेवक, तलाठी, कनिष्ठ लिपिक इत्यादी पदांच्या भरतीबाबत गेल्या पाच महिन्यात निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मनविसेकडून करण्यात आला.अखेर राज्यातील तरुणांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या सरळ सेवा पद भरतीबाबत सोमवारी(दि. १७) राज्य सरकारने शासन निर्णय करून स्पष्टता दिली.
राज्यातील तरुणांच्या प्रचंड प्रतिक्षित असणारी सरळ सेवा पद भरतीबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण आयुक्त, महा आयटीचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. सोमवारी राज्य सरकारने ही भरती 'महाआयटी' कडून कंपनी निवड करून, निवड समितीच्या नियंत्रणात होणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
याबाबत कल्पेश यादव यांनी सांगितले, सरळ सेवा पदभरतीसाठी चालू असणारी कंपनी नेमणूक प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणार आहे व याच पद्धतीने तिथे ही यश येईल अशी आशा आहे. विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणे किंवा याचिका दाखल करणे यामुळे फक्त प्रशासन वेठीस धरले जाते आणि प्रश्न तसेच राहतात, त्यामुळे असे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तरच विद्यार्थ्यांचे हित जोपासता येईल, सामान्य प्रशासन विभागाच्या आजच्या शासन निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.