बंडखोर नॉट रिचेबल अन् उमेदवार झाले हँग!
By Admin | Updated: February 12, 2017 04:51 IST2017-02-12T04:51:21+5:302017-02-12T04:51:21+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (दि. १३) अखेरचा दिवस आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार

बंडखोर नॉट रिचेबल अन् उमेदवार झाले हँग!
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (दि. १३) अखेरचा दिवस आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु बहुतेक सर्व बंडखोर सध्या ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. परंतु, बंडखोरांच्या या पवित्र्यामुळे उमेदवारांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर मात्र हँग होण्याची पाळी आली आहे.
बंडखोरी रोखली नाही तर निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी ५२९, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी ९०५ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यातील बहुतेक अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी केली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन गेल्या पाच वर्षामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमही राबविले होते. पक्षश्रेष्ठींच्या सर्व आदेशांचे इमानइतबारे पालन करत आंदोलन- मोर्चे काढलेले आहेत. गटातील प्रत्येकासाठी रात्रं-दिवस धावले आहेत. गटातील मुलांच्या बारश्यापासून, लग्न, एकसष्ठी, अंत्यसंस्कार, ते दशक्रिया विधी मध्ये नियमित हजेरी लावलेली आहे. असे असताना बंडखोरांनी माघारी न घेतल्यास केलेल्या साऱ्यावर पाणी फिरणार आहे. गावातील रखडलेल्या कामासाठी जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा करत होते. अनेक जण तर मी सदस्य झाल्यानंतर तत्काळ कामे करणार, अशी ग्वाही देत होते.
पक्षश्रेष्ठीनीही उमेदवारांची धडपड पाहून यंदा तुम्हाला संधी असल्याचे जाहीर केले होते. यामुळे अधिक जोमाने कार्यकर्ते कामाला लागले होते. आरक्षणामुळे अनेकांना प्रथमच संधी मिळणार होते. पक्ष संधी देणार या आशेवर अनेकांनी अपक्ष अर्ज भरला आहे.
सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी गुपचुप उमेदवारांना हाती एबी फॉर्म दिला. उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये जवळपास दहा जणांनी अर्ज भरले आहेत. पंचायत समितीच्या एका गणामध्ये सहा जणांनी अर्ज भरले आहेत. जवळपास सर्वच पक्षामध्ये थोड्या-अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे.
या नाराजांनी अपक्ष किंवा आघाडी करून लढण्याबाबत विचार व चर्चा करत आहे. गट व गणातील नाराजांनी एकत्र करून आघाडी केल्यास किती फायदा होईल याची चाचपणी केली जात आहे. बंडखोराच्या या चाचपणीमुळे उमेदवार संकटामध्ये आले आहे. बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवार स्वत: घरी जाऊन भेट घेत आहे. उमेदवार पक्षातील आमदार, वरिष्ठ नेत्यांना एकदा माज्यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी सांगा असे सांगत आहे. बंडखोरांना पक्षातील वरिष्ठ पद, समितीमध्ये सदस्य अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप बंडखोर आपल्या विचारावर ठाम असल्याचे सांगित आहे. काही जण तर देवदर्शन, पर्यटनाला गेले आहे. अशा साऱ्यांचे फोन नॉट रिचेबल लागत असल्याने उमेदवारांचे मात्र बीपी हाय होत आहे.
बंडखोरी रोखणार : नेत्यांचा दावा
जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोरी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये झाली आहे. यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व तालुकास्तरावर आमदार, अन्य पदाधिकारी पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी व अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करीत आहे.परंतु, काही बंडखोर उमेदवारांचा थेट संपर्कच होत नसल्याने पदाधिकारी टेन्शनमध्ये आले आहे. याबाबत कामठे यांनी सांगितले की, पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू असून, आम्हाल नक्की यश मिळेल.