'त्या' गंभीर घटनेची तुम्हाला माहिती कशी मिळत नाही; वरिष्ठांकडून उपायुक्त-क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:33 PM2020-05-16T21:33:37+5:302020-05-16T21:34:18+5:30

पालिकेच्या उपायुक्त-क्षेत्रीय अधिकाऱ्याला नोटिसा, अतिरिक्त आयुक्तांची कारवाई

Really ask how you don't get information about the incident | 'त्या' गंभीर घटनेची तुम्हाला माहिती कशी मिळत नाही; वरिष्ठांकडून उपायुक्त-क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झाडाझडती

'त्या' गंभीर घटनेची तुम्हाला माहिती कशी मिळत नाही; वरिष्ठांकडून उपायुक्त-क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झाडाझडती

Next
ठळक मुद्दे१०८ च्या जिल्हा व्यवस्थापकाला खुलासा करण्याचे आदेश

पुणे : केवळ १०८ रुग्णवाहिका चालकांनी येण्यास नकार दिल्याने तीन तास वेदनेने तळमळत असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याच्या घटनेची गंभीर दखल पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून या घटनेची माहिती तुम्हाला कशी मिळत नाही अशी खरमरीत विचारणा करीत संबंधित परिमंडळाचे उपायुक्त आणि सहायक क्षेत्रीय आयुक्त यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच १०८ च्या जिल्हा व्यवस्थापकाला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नाना पेठेतील मनुशाह मस्जिदजवळ राहणाऱ्या येशूदास मोती फ्रान्सिस (वय ५७) यांची तब्येत शुक्रवारी मध्यरात्री बिघडली होती. शुक्रवारी मध्यरात्री बारा-साडेबाराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घराबाहेर आणून खुर्चीवर बसविण्यात आले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. परंतु, त्यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनीही १०८ ला फोन केला. परंतु, कोणीही यायला तयार नव्हते. पहाटे तीनपर्यंतचा वेळ घालवण्यात आला. या काळात वेदनेने तळमळत असलेले फ्रान्सिस खुर्चीतच मृत्युमुखी पडले. त्यांचा मृतदेह भाजीच्या टेम्पोमधून ससूनपर्यंत वाहून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेचे पडसाद उमटले.

 या घटनेविषयी आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांच्यासह फ्रान्सिस यांचा व्हिडिओ तयार करणाऱ्या कार्यकर्त्याला समर्थ पोलिसांनी बोलावून घेत त्यांचीच चौकशी करायला सुरुवात केली. तुम्ही व्हिडीओ का काढलात अशी विचारणा त्यांनी केल्याचे ढवळे यांनी सांगितले. 

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही घटना पालिकेच्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना समजली नाही हे आश्चर्यजनक आहे. संबंधित परिमंडळाचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांना नोटीस बजावण्यात आली असून ही घटना त्यांना कशी समजली नाही याबाबत विचारणा करण्यात आली आहे. यासोबतच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची ताकीद देण्यात आली आहे. नागरिकांनी १०८ ला फोन केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा लगेच १०१ ला फोन करणे आवश्यक होते. अधिकाधिक नागरिकांपर्यंत १०१ क्रमांक पोहचविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाच्या रुग्णवाहिकेला फोन करण्याचे आवाहन अगरवाल यांनी केले आहे. 

Web Title: Really ask how you don't get information about the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.