देवमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईहून पुण्याला गेले रतन टाटा; फोटो व्हायरल
By देवेश फडके | Updated: January 5, 2021 15:07 IST2021-01-05T15:03:12+5:302021-01-05T15:07:36+5:30
रतन टाटांनी मानवतावादाचे आणखी एक आदर्श उदाहरण घालून दिले असून, आपल्या माजी कर्मचाऱ्याची पुण्यात भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

देवमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईहून पुण्याला गेले रतन टाटा; फोटो व्हायरल
पुणे :टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले रतन टाटा आपल्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी नेहमीच उत्तमोत्तम योजना आखत असतात. मात्र, अलीकडेच रतन टाटा यांच्या एका कृतीने पुन्हा एकदा त्यांच्याविषयी प्रचंड आदर निर्माण करणारी ठरत आहे. एका ट्विटर युझरने रतन टाटा यांच्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहेत. रतन टाटांनी मानवतावादाचे आणखी एक आदर्श उदाहरण घालून दिल्याचे बोलले जात आहे.
झाले असे की, रतन टाटा हे आपल्या माजी कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईहून थेट पुण्याला गेले. रतन टाटा भेटायला गेलेला कर्मचारी टाटा समूहासाठी काम करत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. मुंबईहून पुण्याला गेलेल्या रतन टाटा यांनी या आजारी कर्मचाऱ्याची आवर्जुन भेट घेतली. विशेष म्हणजे सदर कर्मचारी आता टाटांसाठी काम करत नाही. असे असूनही रतन टाटा यांनी आठवणीने भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
रतन टाटा आणि आजारी माजी कर्मचाऱ्याच्या भेटीचा फोटो शेजारील सोसायटीत राहणाऱ्या एकाने ट्विटरवर टाकला आहे. या ट्विटला हजारोच्या संख्येत लाइक्स मिळाले असून, सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. ८३ वर्षीय रतन टाटा यांच्या या कृतीने सर्वच स्तरातून पुन्हा एकदा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत असून, त्यांच्या मनातील आदर वाढल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही २६/११ च्या हल्ल्याची झळ पोहोचलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची रतन टाटा यांनी भेट घेतली होती. तसेच आताच्या घडीला सुरू असलेल्या कोरोना संकटात सरकारला कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत केली होती.