पुणे : गर्दीच्या रस्त्यांवरही अति वेगात बस चालविल्याबद्दल अनेकदा दंड ठोठावल्यानंतरही पुणे महानगर परिवहन महामंडळातील अनेक चालक सुधारताना दिसत नाहीत. जानेवारी महिन्यापासून रॅश ड्रायव्हिंगच्या पीएमपीकडे २६८ तक्रारी आल्या आहेत. चालकांना वेगाची मर्यादा घालून दिलेली असतानाही त्याचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.पीएमपीच्या वाहतुक विभागाने चालकांनासाठी नियमावली केलेली आहे. त्यानुसार बस चालविताना मोबाईलवर बोलू नये, मर्यादेपेक्षा जास्त वेग ठेवू नये, धुम्रपान करू नये, बस थांब्याजवळच थांबवावी, प्रवासी चढ-उतार करेपर्यंत बस हलवू नये अशा सुचना सातत्याने दिल्या जातात. मात्र, अनेक चालक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामध्ये बस वेगाने नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. चालकांना ४० किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी वेगाने बस चालविणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण गर्दीच्या रस्त्यावरही काही चालक खेप संपविण्याच्या घाईमध्ये बस दामटत असतात. रस्त्यावरील खड्ड्े, सिग्नलचेही भान त्यांना नसते. याबाबत प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जाते. याबाबत पीएमपीच्या तक्रार निवारण कक्षाकडे प्रवासी तसेच नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. जानेवारी महिन्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी २६८ तक्रारी आल्या आहेत. इतर तक्रांरीमध्ये सर्वाधिक या तक्रांरीचाही समावेश होतो.रॅश ड्रायव्हिंगबरोबरच ब्रेकडाऊन, चालक मोबाईलवर बोलणे, आसनांची दुरावस्था, थांब्यावर बस न थांबविणे, प्रवाशांशी योग्य वागणुक नसणे यांसह अन्य तक्रारी कक्षाकडे येतात. प्रवाशांकडून बस क्रमांक व ठिकाणासह तक्रारी येतात. या तक्रारी कक्षामार्फत संबंधित आगारांकडे पाठविल्या जातात. त्यावर आगार प्रमुखांकडून चौकशी करून प्रशासनाकडे अहवाल येतो. त्याआधी आगार प्रमुख संबंधितांवर दंडात्मक कारवाई करू शकतात. जर चालकाविषयी पहिलीच तक्रार असले तर केवळ ताकीद दिली जाते. दुसऱ्यांदा तक्रार आल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. नियमानुसार ही कारवाई होते, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली.
पीएमपीच्या २६८ चालकांची रॅश ड्रायव्हिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:05 IST
जानेवारी महिन्यापासून रॅश ड्रायव्हिंगच्या पीएमपीकडे २६८ तक्रारी आल्या आहेत
पीएमपीच्या २६८ चालकांची रॅश ड्रायव्हिंग
ठळक मुद्दे चालकांना वेगाची मर्यादा घालून दिलेली असतानाही त्याचे सातत्याने उल्लंघनचालकांना ४० किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी वेगाने बस चालविणे बंधनकारक