पुणे : शहरातील अतिशय जुने आणि वृक्षवेलींनी बहरलेले एम्प्रेस गार्डन हे खरंतर 'ग्रीन हेरिटेज' घोषित करायला हवे, अशी अपेक्षा वनस्पती अभ्यासकांची आहे. कारण या ठिकाणी अनेक दुर्मीळ वृक्ष-वेलींच्या प्रजाती आहेत. दोनशेहून अधिक वृक्ष थाटात बहरत आहेत. दुर्मीळ आणि जुन्या वृक्षांचे हे जणू वनच बनले आहे. एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन जैवविविधतेचे महत्त्वाचे ठिकाण आहे. या विषयी वनस्पती शास्त्र अभ्यासक डॉ. श्रीनाथ कवडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले,एम्प्रेस गार्डन आणि वन खात्याच्या संशोधन केंद्रात महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेले 'ब्लू मॉर्मन' सारखे फुलपाखरू, मोराच्या १०-१२ जोड्या तसेच 'राखाडी धनेश', 'पॅरॅकेट्स', 'बुलबुल', 'स्वर्गीय नर्तक' किंवा 'पॅराडाईज फ्लायक्याचर', 'सनबर्ड', 'फॅनटेल', 'किंग फिशर', ' ग्रीन बी इटर', 'टेलर बर्ड', 'म्यागपाय रॉबिन', 'ड्रोनगो', 'घुबड', 'घार', इ. पक्षी सापडतात. आग्या मोहोळच्या माश्या, सातेरी व स्टिंग लेस बी, इ. मधमाशांच्या नोंदी इथे आहेत. सरडा, पाली, धामण, नाग, वीरूळा, घोणस, गवत्या सारखे सरपटणारे प्राणीही आढळून येतात.
महाकाय वेलींच्या अनेक प्रजातीगार्डनमध्ये महत्वपूर्ण महाकाय वेलींच्या ४ - ५ प्रजाती सापडतात. त्यात 'कांचन वेल' किंवा 'बाहुनीया वाहली' हा चिंच कुळातील महाकाय वेल पुणे परिसरात याच गार्डनमध्ये आढळतो. साधारणत: ३० मी लांबी पर्यंत वाढणाºया या वेलाने आपला पसारा त्याही पेक्षा अधिक वाढविलेला असून ८-१० वृक्षांवर आपले अधिराज्य अविरत गाजवित आहे, अशी माहिती डॉ. श्रीनाथ कवडे यांनी दिली.
दोनशे वर्षांची महाकाय वेल'पिळुकी' किंवा 'कोम्बरेटम' हा महाकाय वेल आपल्याला एखादया जंगलाची आठवण करून देतो. तसेच सीता अशोकाच्या झाडांवर वाढलेली 'डेरीस स्कॅनन्डेन्स' ही लक्षवेधक महाकाय वेल 'करंज वेल', 'गरुड वेल' अशा मराठी नावाने तर 'ज्वेल वाईन' या इंग्रजी नावाने ओळखली जाते. २०० वर्षांपेक्षा जास्त वय असलेली ही वेल खोडाजवळ दहा-बारा फुटांपर्यंत दोर खंडाच्या गाठीसारखी वाढलेली असून अशी ही भारतातील एकमेव महाकाय वेल असावी.