पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे असलेल्या हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये ‘सप्तश्लोकी गीता’ हे दुर्मीळ हस्तलिखित गवसले आहे. भगवद्गीतेतील एकाच श्लोकाचा विविध प्रतिभावंतांनी वेगवेगळ्या काव्याविष्काराद्वारे उलगडलेला आशय आणि केवळ सातच श्लोकांचा समावेश असलेले अशा स्वरूपाचे हस्तलिखित हा अनमोल ठेवा अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तक निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भगवद्गीतेतील मूळ श्लोक, त्याच आशयाची वामन पंडित यांची समश्लोकी काव्यरचना, मोरोपंत यांची आर्या, तुलसीदास यांचे दोहे, मुक्तेश्वर यांची ओवी, संत तुकाराम महाराज यांचा अभंग आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची ‘भावार्थ दीपिका’मधील रचना अशा ‘सप्तश्लोकी गीता’ या दुर्मीळ हस्तलिखिताचे रूपांतर पुस्तकरूपामध्ये होत आहे. या पुस्तकाबरोबरच ओवी, अभंग, आर्या आणि दोहे यांच्या सुश्राव्य गायनाची सीडी देखील संस्थेतर्फे भेट दिली जाणार आहे.सुवाच्य हस्ताक्षरातील या हस्तलिखितावर कोणाचेच नाव नसल्यामुळे त्याचा लेखक कोण आणि कालखंड यावर प्रकाश पडत नाही. मात्र, वैयक्तिक संग्रहातून तसेच राज्यभरातील देवस्थानांकडून संस्थेकडे प्राप्त झालेल्या पोथ्यांमध्ये हे दुर्मीळ हस्तलिखित सापडले आहे. या ‘समश्लोकी गीता’ हस्तलिखिताला पुस्तक रूपामध्ये आणताना त्यातील काव्यप्रकारांच्या गायनाची सीडी देण्याचा संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाच्या सिद्धतेसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या मराठी हस्तलिखितांच्या समग्र सूचीचे काम सुनीला गोंधळेकर करीत आहेत. ..........काव्यगायन सादर‘समश्लोकी गीता’ या पुस्तकाबरोबर देण्यात येणाºया ओवी, अभंग, आर्या आणि दोहे या काव्यगायनाला डॉ. गौरी मोघे यांचा स्वर लाभला आहे. त्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका पूर्णिमा भट-कुलकर्णी यांच्या शिष्या आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले.
‘सप्तश्लोकी गीते’चे दुर्मीळ हस्तलिखित पुस्तकरूपात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 15:28 IST
भगवद्गीतेतील एकाच श्लोकाचा विविध प्रतिभावंतांनी उलगडलेला आशय आणि केवळ सातच श्लोकांचा समावेश
‘सप्तश्लोकी गीते’चे दुर्मीळ हस्तलिखित पुस्तकरूपात येणार
ठळक मुद्देदुर्मीळ हस्तलिखित गवसले : भांडारकर संस्थेचे पटवर्धन यांची माहितीया प्रकल्पाच्या सिद्धतेसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार