पोलीस व संघर्ष समितीत रंगला वाद
By Admin | Updated: February 16, 2016 01:30 IST2016-02-16T01:30:58+5:302016-02-16T01:30:58+5:30
वाळू वाहतुकीच्या ट्रकवर यवत पोलिसांनी कारवाई केल्याच्या कारणावरून रविवारी (दि. १४) रात्री पोलीस आणि वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलाच वाद झाला.

पोलीस व संघर्ष समितीत रंगला वाद
यवत : वाळू वाहतुकीच्या ट्रकवर यवत पोलिसांनी कारवाई केल्याच्या कारणावरून रविवारी (दि. १४) रात्री पोलीस आणि वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलाच वाद झाला.
पुणे व सोलापूर जिल्हा वाळू वाहतूकदार संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी यवत पोलीस व वाळू वाहतूकदार यांच्यात विविध आरोप-प्रत्यारोप घडत रात्रभर वाद सुरू होता.
या वेळी यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व संघर्ष समितीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यात शाब्दिक चकमकदेखील झाली. शशिकांत चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे अनधिकृत
व्यवसाय करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. यात पोलिसांवर दबाव टाकून कोणी दहशत
निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास धडक कारवाई करण्याचा इशारा दिला.
यानंतर वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे प्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांची कारवाई हेतूपुरस्पर असल्याचे सांगत विविध पोलिसांवर विविध आरोप केले.
आंधळकर यांनी सांगितले, की प्रशासनाला जाग आणण्यासाठी १ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान वाळू वाहतूकदार यांनी संप केला होता. काही आश्वासन मिळाल्याने एकच दिवसापूर्वी संप संपला होता.
मात्र रविवारी रात्री यवत पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी भोईटे व गायकवाड यांनी वाळू वाहतुकीचा ट्रक झिरो पोलिसांच्यामार्फत अडवून पैशांची मागणी केली.
तसेच पैसे न दिल्याने ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणला. याची माहिती समजताच वाळू वाहतूकदार संघटनेचे कार्यकर्ते यवत पोलीस स्टेशनमध्ये आले असता. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी अरेरावीची भाषा वापरून कारवाईचे समर्थन केले.
(वार्ताहर)बेकायदेशीर धंदे करून दहशत करण्याचा प्रयत्न : शशिकांत चव्हाण
रविवारी रात्री वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाकडे कसलीही शासकीय पावती नव्हती. यामुळे पोलिसांनी कारवाई केली. मात्र, वाळू वाहतूक कायदेशीर केल्यास पोलीस कारवाई कशाला करतील. बेकायदेशीर धंदे करून वर दहशत करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे, असे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.