लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :‘सनई चौघडा’ हा मंगलकार्याचे प्रतीक. आजच्या डिजिटल युगात या वाद्याचा निनाद मोबाईल किंवा सीडीमध्ये जरी बंदिस्त झाला असला तरी आजही सनई चौघडा, ताशा, संबळ सारख्या मंगल वाद्यांचा सांस्कृतिक ठेवा जपलाय तो पाचंगे कुटुंबाने. त्यामध्ये एक नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल ते म्हणजे चौघडा सम्राट रमेश पाचंगे यांचे. येत्या २८ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या '' विश्व मराठी ऑनलाइन संमेलनामध्ये सनई चौघडा सादरीकरणाचा मान त्यांना मिळाला असून, त्यांच्या मंगलवाद्याचे सूर जगभर निनादणार आहेत.
गेल्या पाच पिढ्यांपासून पाचंगे कुटुंबीय ही कला जोपासत आहेत. पाचंगे कुटुंबात चौघडा सम्राट जयाजी पाचंगे यांनी ही परंपरा सुरू केली. तोच वारसा त्यांचे नातू रमेश पाचंगे पुढे चालवत आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी हातात घेतलेल्या या वाद्याचे आजही तितक्याच साधनेने आणि तन्मयतेने ते वादन करताना दिसतात. ही कला पुढच्या पिढीमध्ये देखील जिवंत राहावी यासाठी शाळांमधील मुलांना या कलेचे शिक्षण देण्याबाबत त्यांनी आश्वासक पावले उचलली आहेत. आपल्या कलेवरील प्रभुत्वामुळे शहर व राज्यभरातील जवळपास ५८७ पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. आता त्यांच्या कलेचा आस्वाद घरबसल्या घेण्याची संधी देशविदेशातील संगीत प्रेमींना मिळणार आहे.
विश्व मराठी ऑनलाइन संमेलनामध्ये २५ देश सहभागी होत असून, त्यांच्यापर्यंत सनई चौघड्याचा निनाद पोहोचणार आहे..हा एकप्रकारे कलेला मिळालेला सन्मान असल्याची भावना चौघडा सम्राट रमेश पाचंगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.