पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि. २३) मनसेच्यापुणे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महापालिका प्रभाग रचनेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत निवडणूकविषयक रणनीतीवर चर्चा होऊन राज ठाकरे त्याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांना काही आदेश व सूचना देण्याची शक्यता आहे.
मागील महिनाभरात राज यांनी मुंबई, नाशिक अशा काही ठिकाणी याच पद्धतीने बैठका घेतल्या. पुणे शहरात मात्र सलग दोन वेळा येऊनही त्यांनी जिल्ह्याची बैठक घेतली; पण शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली नाही. आता ती बैठक होत आहे. शहरातील मनसेच्या शाखाध्यक्ष, शाखा उपाध्यक्ष तसेच त्यावरचे सर्व विभागप्रमुख, विधानसभा मतदारसंघप्रमुख यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. आपापल्या परिसराच्या निवडणूकविषयक माहितीसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळाली. विधानसभा मतदारसंघनिहाय या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून, मुख्य विषय महापालिका निवडणूक हाच आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आदेश मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, त्याचबरोबर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाबरोबरच्या संभाव्य युतीबाबत माझ्याशिवाय अन्य कोणीही पदाधिकारी काहीही बोलणार नाही, असेही बजावले होते. मराठी विजय मेळाव्यानंतर या युतीची राज्यातील शिवसैनिक (उबाठा) व मनसैनिक यांच्यामध्ये जोरदार चर्चा आहे. युती व्हावी, अशीच बहुतेकांची इच्छा आहे. मात्र, मराठी विजय मेळाव्यानंतर त्यासंदर्भात काहीच हालचाच झाली नाही. उलट, राज यांच्याकडून अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. त्यामुळे ही युती, निवडणुकीची रणनीती, कोणाबरोबर लढायचे की स्वतंत्र लढायचे, अशा अनेक शंका मनसैनिकांच्या मनात आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकाची जागा आरक्षित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता बैठक सुरू होणार आहे. तत्पूर्वी राज समता भूमी येथे भेट देऊन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणार आहेत, अशी माहिती संपर्क नेते बाबू वागसकर यांनी दिली.