PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 20:10 IST2022-02-17T20:09:49+5:302022-02-17T20:10:19+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू

PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती'
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू आहे. सामूहिक नेतृत्वाची कल्पना राबवत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच निरीक्षकांची नियुक्ती केली असून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा अहवाल थेट ठाकरे यांनाच द्यायचा आहे. २५ फेब्रुवारीला ठाकरे पुण्यात मुक्कामी येत आहेत.
शहरातील आठही विधानसभा मतदार संघात एक प्रमुख व त्याला दोन सहायक अशा प्रत्येकी ३ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी त्या विधानसभा मतदारसंघात मनसेची काय राजकीय स्थिती आहे, कोणते कार्यकर्ते आहेत, किती प्रभाव पडू शकतो, संधी आहे की नाही याचा अहवाल बंद पाकिटात घालून ठाकरे यांना द्यायचा आहे. तिघांनी एकत्रित अहवाल न करता प्रत्येकाने स्वतंत्र व त्याला काय वाटते तेच अहवालात द्यायचे आहे अशी सुचना ठाकरे यांनी केली आहे.
स्वत: ठाकरे हे अहवाल पाहणार आहेत. त्यांच्याच आदेशावरून मनसेच्या कार्यालयात सोमवारी शहरातील स्थानिक नेत्यांची एक मॅरेथाॅन बैठक झाली. त्यात सर्वं प्रमुख कार्यकर्त्यांना कामासंबधीच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील शाखा, त्यांचे प्रमुख, कोण कार्यरत आहेत, कोण काम करत नाही याची एकत्रित माहिती जमा करण्यात येत आहे. काम न करणाऱ्यांना त्वरीत बाजूला करण्याचा निर्णय होणार आहे अशी माहिती मिळाली.
युतीवर बोलायचे नाही
काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीबरोबर युती करावी अशा विचारांचे आहेत. त्यामागे उमेदवारीला फायदा होईल हा हेतू आहे. मात्र तूर्त या विषयावर जाहीरपणे किंवा खासगीतही कोणाशी बोलू नये असे ठाकरे यांनी बजावले असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. त्यामुळे भाजपा युती या विषयावर काही विचारले की मनसेचे सगळेच कार्यकर्ते हाताची घडी करून तोंडावर बोट ठेवतात.