पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हाने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. आता अचानक सुरू झालेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला आहे. रविवारी हवामान विभागाकडून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
पुण्यातही मंगळवारनंतर यलो अलर्ट देण्यात आला होता. पुण्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासुन पुण्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झाली आहे. कात्रज, कोंढवा, हडपसर, धायरी, मध्यवर्ती भागात पेठांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडू लागला आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला होता. दुपारच्या वेळेत जोरदार वारेही सुटत होते. तसेच मधेमधे ढगाळ वातावरण तयार होत होते. अखेर आज पावसाला सुरुवात झाली. पावसाने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. या पावसाने गरमीपासून नागरिकांची सुटका झाल्याचे चित्र आहे.