पुण्यात थंडीच्या मोसमात 'वरुणराजा'ची हजेरी; पुणेकरांची उडाली धांदल न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 09:11 PM2021-01-07T21:11:05+5:302021-01-07T21:11:26+5:30

पुण्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते.

Rain presence in Pune during the cold season; Punekar's rush is huge | पुण्यात थंडीच्या मोसमात 'वरुणराजा'ची हजेरी; पुणेकरांची उडाली धांदल न्यारी

पुण्यात थंडीच्या मोसमात 'वरुणराजा'ची हजेरी; पुणेकरांची उडाली धांदल न्यारी

Next

पुणे : मागील काही दिवसांअगोदर पुणेकरांना अक्षरश: गोठवणाऱ्या थंडीने जेरीस आणले होते. परंतू पुन्हा एकदा पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण होत उकाडा देखील वाढला होता. गुरुवारी संध्याकाळी शहरात वरुणराजाचे आगमन झाले आणि घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची एकच धांदल उडाली. शहरातील बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, डेक्कन, कर्वेरस्ता,बुधवार पेठ, कसबा पेठ, नगर रस्ता आदी भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. 

पुण्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते. पण शक्यता वर्तविण्यात आल्यावर सुद्धा या कालावधीत पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुणेकर गुरुवारी बिनधास्त होते. पण  याचदरम्यान अचानक धडकलेल्या पावसाने पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, द्रोणीय स्थितीमुळे हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याचा इशारा देताना राज्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण व मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन-चार दिवस राज्यात रात्रीच्या थंडीचा कडाका कमी राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात ऐन थंडीत उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. गेल्या १० वर्षातील डिसेंबर महिन्यातील सर्वात उबदार असलेली पाचवी रात्र मंगळवार ठरली होती. मंगळवारी सकाळी पुण्यातील किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे जिल्हा व शहरात आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता 
पुणे जिल्हा व शहरात आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ५, ६ व ७ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच ८ जानेवारीला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
---

Web Title: Rain presence in Pune during the cold season; Punekar's rush is huge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.