पुणे :पुणेरेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मंजुरी मिळून नऊ महिने होऊन गेले तरी अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्याची निविदानंतरची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनची सुरक्षा भक्कम कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यातून दररोज ७२ आणि स्थानकावरून २०० रेल्वे गाड्या धावतात. तसेच रोजगाराच्या संधीमुळे बाहेरील राज्यातून पुण्यात येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. तसेच लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. या वाढत्या प्रवाशांची संख्या पाहता स्थानकावर उपलब्ध असलेली सुविधा अपुरी ठरत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच, लोणावळा ते दौंड मार्गावर लोकल वाहतूक येथून दररोज सुरू असते. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर नेहमीच गर्दी असते. त्यामध्ये पॉकेटमार, मोबाईल हिसकावणे व इतर प्रकारचे गुन्हेदेखील घडतात. तसेच, अपहरण व लैंगिक अत्याचाराचे प्रकारदेखील यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडले आहेत. त्यामुळे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली जात होती. परंतु, त्याचे काम मात्र संथ गतीने सुरू आहे.
केवळ ७४ सीसीटीव्ही कॅमेरे
पुणे रेल्वे स्टेशन येथे सध्या ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. ते बसवूनदेखील काही वर्षे उलटली आहेत. त्यामुळे नव्याने ४६ सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये आरोपींचा चेहरा ओळखतील असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सीसीटीव्ही बसविण्याची चर्चा सुरू आहे. आता सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी मिळाल्याचे मार्च महिन्यातच रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण, अद्याप तरी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसलेले नाहीत.
प्रवासी सावध होण्याची गरज...
पुणे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांकडून आलेल्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी जिवाचा आटापिटा केला जातो. त्यामुळे अनेकांची मदत घेतली जाते. परंतु, मदत घेताना आपली फसवणूक तर होत नाही ना ? याची काळजी घेणे हे प्रवाशांच्या दृष्टीने हिताचे ठरेल.
स्थानकावरील स्थिती
दैनंदिन प्रवासी संख्या - दीड लाख
ये-जा करणाऱ्या गाड्या - २००
पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या - ७२
एकूण सीसीटीव्ही संख्या - ७४
नवीन प्रस्तावित सीसीटीव्ही