वारजे : रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आपण नाराज नसून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लवकरच बसून निर्णय घेतील, असा आपला आशावाद असल्याचे मत राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी कर्वेनगर येथे बोलताना व्यक्त केले. ते येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. पक्षाचे राज्य युवा समन्वयक अनिकेत जावळकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. यावेळी शहर संपर्क प्रमुख अजय भोसले, राजेश पळसकर, श्रद्धा शिंदे, प्रतीक्षा जावळकर, विनोद जावळकर आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून पक्षाच्या हिताच्या विरुद्ध वागणार नाही, असे म्हणत त्यांनी नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र "सबुरीका फल मिठा होता है" असे म्हणत मात्र रायगड मधील जनतेच्या हिताच्या दृष्टीने लवकर निर्णय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना बेस्ट पतपेढी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी का भेट घ्यावी याचे कारण गुलदस्त्यातच आहे, असे ते म्हणाले.शिवसेनेने बोगस मतदानाच्या भीतीने अॅप तयार केले नसून कार्यकर्ते व नेते अलर्ट राहावेत यासाठी व पक्षाच्या हितासाठी ॲप तयार केल्याची पुस्ती गोगावले यांनी जोडली. तसेच रायगड येथील बोट दुर्घटनेची आपल्याला आताच माध्यमातून माहिती मिळाली असून याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्याच्या घरी सांत्वन भेट
युवासेनेचे पदाधिकारी भूषण वर्पे यांना पितृशोक झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी शिवणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांचे वडील किसन वर्पे हे देखील शिवसैनिक असल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी जितेंद्र जंगम, अनिकेत जावळकर, अक्षय सुतार, विनायक राजपुरोहित, गणेश सातव, सोमनाथ कुटे यांसह युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.