पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 05:23 IST2025-04-30T05:22:41+5:302025-04-30T05:23:18+5:30

अँटी रॅगिंग समितीची बैठक, तयार करणार अहवाल

Ragging at B. J. Medical College in Pune; Ministry takes note after being informed | पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पुणे/मुंबई : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मंत्रालय स्तरावरुन चक्रे फिरल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केली होती.

त्यामध्ये तक्रारदार विद्यार्थ्यांकडून आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे या विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता. मात्र, त्याच्या तक्रारीची योग्य दखल कॉलेज पातळीवर घेतली गेली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

२००६ मध्येही झाले होते रॅगिंग' : २७ ऑगस्ट २००६ रोजीदेखील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या मुलांवर रात्री १० वाजता वरिष्ठ विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. २०२४ मध्येही पहिल्या वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना टार्गेट करून रॅगिंग केले होते.

२०१९ मध्ये मुंबईमध्येही घडली होती घटना : २०१९ मध्ये रँगिंगला कंटाळून नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी हिने हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

रुग्णालय प्रशासनाचे मौन

 या प्रकाराबाबत सर्वांनीच 'मौन' बाळगले असून, माध्यमांपर्यंत माहिती पोहोचू नये याची पुरेपूर दक्षता रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.

ससूनचे अधिष्ठाता डाॅ. एकनाथ पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैठकीत असल्याचा मेसेज करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधणे टाळले.

एका निवासी डॉक्टरने रॅगिंग केल्याची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत त्यानुषंगाने अँटी रॅगिंग समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली. त्यात या तक्रारीची चौकशी करण्यात येत आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित केली जाणार आहे.

हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

Web Title: Ragging at B. J. Medical College in Pune; Ministry takes note after being informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे