पुणे: घरी निघालेल्या एकाला रस्त्यात अडवून चाकूने पोटात भोसकून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सलिम शेख आणि अमिर शेख (दोघेही रा. मार्कंडेयनगर, वैदवाडी, हडपसर) यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आवेज फिरोज शेख (१२, रा. मार्कंडेयनगर, वैदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, ३१ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी वैदवाडी येथील मशिदीतून नमाज पठण करून वैदवाडी येथील भीम साम्राज्य प्रतिष्ठान येथून चालले होते. त्या ठिकाणी फिर्यादी यांना गर्दी झालेली दिसली. गर्दीतून फिर्यादीने वाट काढून पाहिले असता फिर्यादी यांचे मामा सलिम अमिन सय्यद यांना त्यांच्याच वस्तीत राहणारा सलीम शेख व त्याचा मोठा भाऊ अमिर शेख हे दोघे मारहाण करत होते. त्याचवेळी सलिम शेख याच्या हातात सूऱ्यासारखे धारदार हत्यार होते.
अमिर शेख याने सलिम सय्यद यांची कॉलर पकडून सलिम शेख यास म्हणाला की, ‘डाल दे इसके पेट में’ त्यानंतर सलिम शेख याने त्याच्या हातातील चाकू फिर्यादीचे मामा सलिम सय्यद यांच्या पोटात खुपसला. यावेळी त्यांच्या पोटातून रक्तस्राव होऊ लागला. तसेच सलिम सय्यद ओरडत जमिनीवर खाली कोसळले. यावेळी फिर्यादी मध्ये पडले, त्यांनी सय्यद यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले. त्यावेळी अमिर शेख हा तेथून पळून गेला. मात्र सलिम याला फिर्यादी यांनी पकडून ठेवले. त्यानंतर रिक्षातून सलिम सय्यद यांना रुग्णालयात दाखल केले. चाकूने सय्यद यांच्या पोटात भोसकल्याने त्यांना पोटावर आणि पाठीवर जखम झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.