पुणे: ‘अरे आव्वाज कुणाचा’च्या जयघोषात महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला शनिवारी (दि.१३) जल्लोषात सुरुवात झाली. हीरक महोत्सवी करंडकावर नाव कोरायचेच, अशी जिद्द बाळगून एकूण ९ महाविद्यालयीन संघ स्पर्धेत उतरले आहेत. भरतनाट्य मंदिर येथे अंतिम फेरीला म. ए. सो. वरिष्ठ महाविद्यालय, पुणे या संघाने सादर केलेल्या ‘यथा प्रजा, तथा राजा’ या एकांकिकेने प्रारंभ झाला.
पावसात आला कोणी.. (मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय) आणि रामरक्षा (आय. एम. सी. सी. स्वायत्त) या एकांकिका पहिल्या दिवशी सादर झाल्या. रविवारी (दि. १४) सकाळी ९ ते १२ या वेळात काही प्रॉब्लेम आहे का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर), व्हिक्टोरिया (डी. ई. एस. पुणे युनिव्हर्सिटी, पुणे), निर्वासित (श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), तर सायंकाळी ५ ते ८ या वेळात आतल्या गाठी (स. प. महाविद्यालय), कोयता (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय), वामन आख्यान (मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड) या एकांकिका सादर होणार आहेत. स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री जाहीर केला जाणार आहे.