स्वच्छ पुणे सुंदर पुणे ; स्वच्छ सर्वेक्षणात गेले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 12:13 IST2019-03-07T12:00:43+5:302019-03-07T12:13:35+5:30
स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला चांगले मार्क मिळावेत यासाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक मेहनत घेतली असली तरी स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा क्रमांक देशात 10 वरुन 14 वर घसरला आहे.

स्वच्छ पुणे सुंदर पुणे ; स्वच्छ सर्वेक्षणात गेले मागे
पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला चांगले मार्क मिळावेत यासाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक मेहनत घेतली असली तरी स्वच्छ सर्वेक्षणात 10 लाखांच्यावर लाेकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक देशात 10 वरुन 14 वर घसरला आहे. तर एक लाख लाेकसंख्येत 37 वा क्रमांक मिळाला आहे. तसेच पालिकेला थ्री स्टार रेंटिंग मिळण्याची मागणी करण्यात आली हाेती, परंतु पालिकेला 2 स्टार रेंटिंग मिळाले आहे. पुण्याला स्वच्छ सर्वेक्षणात आणखी चांगले मार्क मिळण्यासाठी ज्या गाेष्टींची कमतरता राहिली त्या भरुन काढण्याचा आशावाद पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला आहे. तसेच या वर्षी अधिक चांगले काम करणार असून, वर्षभर नियमितपणे स्वच्छतेसाठी नियमितपणे काम करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु राज्यातील प्रमुख शहरांचे क्रमांक घसरले आहेत. 2018 साली 10 लाखांच्यावर लाेकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याला देशात 10 वा क्रमांक मिळाला हाेता, यंदा हा क्रमांक घसरुन 14 वर आला आहे. तसेच मुंबईचा क्रमांक 18 वरुन 49 वर, नागपूरचा 55 वरुन 58 वर तर नाशिकचा 63 वरुन 67 व्या क्रमांकावर गेला आहे. औरंगाबाद शहराचा क्रमांक तर 128 वरुन थेट 220 वर गेला आहे. नवी मुंबईने मात्र उल्लेखनीय कामगिरी केली असून राष्ट्रीय पातळीवर नवी मुंबईने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
पुण्याला स्वच्छ सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत यासाठी महापालिकेकडून अधिक मेहनत घेण्यात आली हाेती. गेल्या नाेव्हेंबरपासून रस्त्यावर थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे, लघवी करणारे यांच्यावर पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून लाखाेंचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबराेबर रस्त्यावर थुंकणाऱ्यांना रस्ता साफ देखील करण्यास लावले हाेते. अनेक रस्ते, भिंती देखील सुशाेभित करण्यात आल्या हाेत्या. तरीही काही भागांमध्ये अस्वच्छता राहिल्याने तसेच कचऱ्याचे 100 टक्के वर्गीकरण, 100 टक्के घरांमध्ये जाऊन कचरा गाेळा करणे यात शहर कुठेतरी मागे पडल्याने यंदा स्वच्छतेत शहराचा क्रमांक घसरला आहे. पालिकेने स्टार रेटिंगमध्ये स्वतःला थ्री स्टार रेटिंग देण्याचा निर्णय घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवला हाेता. परंतु यासाठी असलेल्या शंभर टक्के घरांमध्ये जाून कचरा गाेळा करणे, गाेळा केलेल्या 80 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करणे, तब्बल 75 टक्क्यांपेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे, मुळा- मुठा नद्यांची स्वच्छता, शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी अशा अनेक मुद्द्यांवर हे थ्री स्टार रेटिंग देणार हाेते. परंतु गेल्या अनेक वर्षात न झालेली कामे केवळ दीड महिन्यात करण्याचे साेंग आणले गेले, त्यामुळे या थ्री स्टार रेटिंगचा फुगा फुटला. पुण्याला टू स्टार रेटिंग मिळाले आहे.