पुणे, दि. 15 - ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात मोठी वाढ केल्याचे कारण सांगत एका माथेफिरुने पुणे परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना खूनाची धमकी एक पत्राद्वारे दिली आहे. अत्यंत शिवराळ भाषेत लिहिण्यात आलेल्या या पत्रात कुटुंबाचे बरेवाईट करण्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी पीएमपीच्या वतीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, संरक्षणाची मागणी देखील करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारच्या टपालात पीएमपीच्या कार्यालयात हस्ताक्षरातील हे पत्र मिळाले. भुजंगराव मोहिते-पाटील या नावाने हे पत्र आले असून, त्यावर सुखसागर नगर, कात्रज येथील पत्ता आहे. रविवारी (दि. १०) हे पत्र लिहिण्यात आल्याचे दिसून येत आहे. पीएमपीने ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासमध्ये साडेचारशेवरुन सातशे रुपयांपर्यंत वाढ केली होती. त्याचा आधार घेत हे पत्र लिहिले आहे. त्यानंतर मुंढे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर शिवराळ भाषेत लिखान करण्यात आले आहे. तसे, आमचे नक्षलवाद्यांच्या संपर्कात असून, तुमचे काहीही करु शकतो. अगदी तुमचा खून देखील करु अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली आहे. तसेच, या धमकीला पोकळ समजू नका, असा इशाराही त्यात देण्यात आला आहे. या पत्राबाबत पीएमपीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, या पत्राबाबत मुंढे यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी दूरध्वनीवरुन बातचीत केली असल्याचे समजते.
पुण्यात पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 21:20 IST