पुण्याची जनता वसाहत झाली रंगबेरंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 20:45 IST2019-03-06T20:43:40+5:302019-03-06T20:45:48+5:30
जनता वसाहतीला आता रंगबेरंगी साज चढविण्यात आला आहे. त्यामुळे या वसाहतीचा चेहरा माेहरा बदलून गेला असून येथून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पुण्याची जनता वसाहत झाली रंगबेरंगी
पुणे : पर्वतीच्या पायथ्याशी असलेली जनता वसाहत. चिंचाेळ्या गल्ल्या, एकाला एक लागून असलेली घरे, अशी काहिशी तिची ओळख. परंतु या जनता वसाहतीला आता रंगबेरंगी साज चढविण्यात आला आहे. त्यामुळे या वसाहतीचा चेहरा माेहरा बदलून गेला असून येथून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शहरातील झाेपडपट्टी व परिसरात महापरिवर्तन कार्यक्रमाच्या अनुषंगाने रुबला नागी आर्ट फाऊंडेशनद्वारे सीएरआरमधून रंगकाम, चित्रकला आणि सुशाेभिकरणावर भर दिला जात आहे. जनता वसाहत झाेपडपट्टीमध्ये या उपक्रमांतर्गत कष्टकऱ्यांच्या घरांना इंद्रधनुषी साज चढविण्यात येत आहे. दाेन दिवसांपासून वसाहतीमधील झाेपड्यांना रंग देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या नवीन उपक्रमामुळे या झाेपडपट्टीला एक वेगळाच लुक मिळाला आहे. सहसा या घरांकडे लक्ष जात नसे, परंतु या नव्या रंगकामामुळे ही घरे आता नजरेत भरु लागली आहे.
पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हाेत असतात. पुणेरी पाट्या सर्वश्रुत आहेतच आता पुण्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहेत. पुण्यातल्या अनेक भिंतींवर विविध आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत. या चित्रांच्या माध्यमातून विविध संदेश देखील देण्यात आले आहेत. तसेच हडपसर व सीओईपी येथील उड्डाणपुलांच्या खाली देखील विविध चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते देखील सांस्कृतिक हाेत आहेत.