पुणेकरांचा काही नेम नाही; झाडांचे श्राद्ध घालून पालिकेचा केला निषेध

By श्रीकिशन काळे | Published: October 14, 2023 03:41 PM2023-10-14T15:41:58+5:302023-10-14T15:43:21+5:30

या पुणेकरांच्या अनोख्या श्राध्दाने महापालिकेचे डोके आता तरी ठिकाणावर येईल का, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली...

Punekars have no name; Protested against the municipality by worshiping trees | पुणेकरांचा काही नेम नाही; झाडांचे श्राद्ध घालून पालिकेचा केला निषेध

पुणेकरांचा काही नेम नाही; झाडांचे श्राद्ध घालून पालिकेचा केला निषेध

पुणे : विविध विकासकामांसाठी पुणे महापालिकेने शहरातील बळी घेतलेल्या झाडांचे श्राध्द आज सकाळी ओंकारेश्वर मंदिराजवळील घाटावर घालण्यात आले. त्यासाठी सर्व विधी पूर्ण करून महापालिकेचा निषेध केला. तसेच नदीकाठ सुधार (आरएफडी)च्या नावाने देखील श्राध्द घालण्यात आले. या पुणेकरांच्या अनोख्या श्राध्दाने महापालिकेचे डोके आता तरी ठिकाणावर येईल का, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

शहरात दर महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणांनी झाडे तोडली जात आहेत. त्यासाठी पुणे महापालिका परवानगी देखील देत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याचा विरोध करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत कापलेल्या झाडांचे श्राध्द घालून पालिकेने आता तरी ठिकाणावर यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सकाळी श्राध्द घालण्यासाठी हळूहळू नागरिक जमा झाले आणि सर्वांनी हार, फुले, पुजेचे साहित्य आणले होते. त्यानंतर सर्वांनी मिळून वडाच्या झाडाखाली हे श्राध्द केले. तिथे काही फलकही लावले होते. त्यामध्ये मुठा नदी वाचवा, झाडे वाचवा असा संदेश लिहिलेला होता.

पुणेकर कधी काय करतील ? ते सांगता येत नाही. झाडांचे श्राध्द घालण्याची घोषणा झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी यावर चर्चा सुरू झाली होती. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते, ते उगीच नाही. त्यामुळे हा श्राध्द करण्याचा प्रकार म्हणजे महापालिकेच्या एकूण कारभाराचा निषेध करण्यासारखे आहे. पुणे महापालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना सर्व मार्गांनी सांगितले तरी देखील ते पुणेकरांचे काही ऐकत नाहीत. त्यामुळे अखेर हा श्राध्द घालण्याचा निर्णय सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी घेतला.

सिमेंटच्या इमारती वाढल्या, झाडं कमी

पुणे महापालिकेने मेट्रोसाठी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लगतचा रस्ता रूंद करण्यासाठी आणि नदीकाठ सुधारसाठी झाडे तोडली व आणखी तोडणार आहेत. त्याच्या विरोधात हा उपक्रम झाला. शहरात केवळ सिमेंटच्या इमारती वाढत आहेत, झाडं मात्र कमी होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन पालिकेच्या या धोरणाला विरोध करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

Web Title: Punekars have no name; Protested against the municipality by worshiping trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.