पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:44 IST2019-05-14T15:41:58+5:302019-05-14T15:44:07+5:30
आज पुणेकरांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. ठिक 12.31 ला सूर्य बराेबर डाेक्यावर असल्याने नागरिकांची सावली त्यांच्या पायाखाली आली हाेती.

पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस
पुणे : पुण्याचे अक्षांश 18.5 असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करीत असताना आज पुणेकरांची सावली एका मिनिटासाठी नाहीशी झाली हाेती. आज पुणेकरांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. ठिक 12.31 ला सूर्य बराेबर डाेक्यावर असल्याने नागरिकांची सावली त्यांच्या पायाखाली आली हाेती. तसेच वर्तुळाकार वस्तूंची सावली एका मिनिटासाठी नाहीशी झाली हाेती.
ज्याेतिर्विद्या परिसंस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे झीराे शॅडाेचे तसेच दुर्बिणीतून साैर डागांचे निरीक्षण करण्याची संधी नागरिकांना देण्यात आली हाेती. यावेळी शेकडाे पुणेकरांनी हजेरी लावत सावली नाहिशी हाेण्याचा अनुभव घेतला. ज्याेतिर्विद्या संस्थेतर्फे सावली कशी नाहिशी हाेते हे पाहण्यासाठी विविध उपकरणे सुद्धा ठेवली हाेती. तसेच 12 वाजल्यापासून सावली नाहिशी हाेण्यापर्यंतचा प्रवासाचे माेजमाप करण्यात येत हाेते. अखेर 12.31 मिनिटांनी अवघ्या एका मिनिटासाठी सावली नाहीशी झाली. यावेळी लहान मुलांनी गर्दी केली हाेती. प्रत्येकजण आपली सावली आपल्या पायापाशी आली आहे का हे पाहत हाेते. अनेकांनी याचे फाेटाे सुद्धा आपल्या कॅमेरात टिपले. नागरिकांची सावली त्यांच्या पायापाशी जमा झाली हाेती तर गाेलाकार वस्तूंची सावली नाहिशी झाली हाेती.
या संस्थेचे सदस्य डाॅ. सागर गाेखले म्हणाले, राेज आपण सूर्य मध्यानिला आला असे म्हणत असताे परंतु राेज ताे बराेबर डाेक्यावर येत नसताे तर ताे दक्षिणेला किंवा उत्तरेला असताे. हिवाळ्यात सूर्याचा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरु हाेताे. तेव्हा उत्तरायण सुरु हाेते. 23 मार्चला सूर्य विषववृत्त पार करताे. पुणे हे 18.5 अक्षांशाला असल्याने आज पुण्यात शून्य सावली दिवस पाहायला मिळला. या दिवशी गाेलाकार व उभ्या वस्तूंची सावली नाहिशी हाेते. तसेच माणसाची सावली यावेळी पायाखाली येते. याला आपण बिन सावलीचा दिवस म्हणताे. सूर्य दक्षिणेला जाताना पून्हा हा दिवस अनुभवायला मिळताे. परंतु त्यावेळी जुलै महिना असल्याने आपल्याकडे पावसाळा असताे त्यामुळे आपल्याला ताे पाहता येत नाही.