अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 21:44 IST2023-12-06T21:44:32+5:302023-12-06T21:44:45+5:30
- जे पी नड्डा, भैय्याजी जोशी, स्वामी गोविंद देव गिरी महाराज, मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र
पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए' हा उपक्रम येत्या १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचा शुभारंभ रविवार दि १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर होईल, अशी माहिती हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी कळविली आहे.
उद्घाटनानंतर १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यातील फर्गसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार असल्याचेही अनघा घैसास म्हणाल्या. सदर उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करणे आवश्यक नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आयोजकांच्या वतीने याआधी उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आता कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची आवश्यकता नाही, असे कळविण्यात आले आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना अनघा घैसास म्हणाल्या, “अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यास हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे. या उपक्रमाद्वारे भारतीय समाजातील अनेकविध जाती, पंथ, प्रांतातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामरायासाठी वस्त्र विणायला एकत्र येऊन जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवतील हा आमचा विश्वास आहे.”
या उपक्रमाचे उद्घाटन रविवार, दि. १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर होईल. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात होईल. तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, राज्याच्या पर्यटन आणि कौशल्य, विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित असतील. यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. याच कार्यक्रमात राममंदिराच्या आंदोलनात सहभागी आणि सबंधित लोकांचे अनुभव कथन असलेल्या ‘राममंदिराचे रामायण’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल.