रांजणगाव गणपती : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती कारेगाव गटात भाजपाच्या स्वाती पाचुंदकर यांनी २,१९९ मतांनी विजय मिळवत गटात कमळ फुलवले आहे. रांजणगाव गणपती पंचायत समिती गणातून भाजपाचे सागर देवकर तब्बल ६,१९१ मतांनी विजयी झाले असून कारेगाव गणातूनही भाजपाच्या मनीषा पाचंगे ३३५ मतांनी विजयी झाल्या आहेत. या गटातून भाजपाच्या तिन्ही उमेदवारांनी विजय मिळवला असून संपूर्ण गटात कमळ फुलले आहे.
रांजणगाव गणपती कारेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक पाचुंदकर परिवारातील महिला एकमेकींच्या विरोधात होत्या. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आणि संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष या गटावर लागले होते. या दुरंगी लढतीत भाजपाकडून स्वाती पाचुंदकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती पाचुंदकर निवडणूक रिंगणात होत्या. या लढतीत भाजपाच्या स्वाती पाचुंदकर यांना १७,६१७ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर यांना १५,४१८ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपाच्या स्वाती पाचुंदकर २,१९९ मतांनी विजयी झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर या पराभूत झाल्या.
रांजणगाव गणपती पंचायत समिती गणातून भाजपाचे सागर देवकर यांना ११,४२१ मते मिळाली. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश फंड यांना केवळ ५,२३० मते मिळाल्याने भाजपाचे सागर देवकर तब्बल ६,१९१ मतांनी विजयी होऊन त्यांनी विरोधी उमेदवार महेश फंड यांचा दारूण पराभव केला. याच गणात संदीप सोनवणे हे अपक्ष उमेदवार होते. कारेगाव गणातून भाजपाच्या मनीषा पाचंगे यांना ६,९१२ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला नवले यांना ६,५७७ मते मिळाल्याने मनीषा पाचंगे कारेगाव पंचायत समिती गणात ३३५ मतांनी विजयी होऊन त्यांनी विरोधी निर्मला नवले यांचा पराभव केला तर याच गणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अक्षय नाणेकर यांना २,७६८ मतांवर समाधान मानावे लागले. पाचुंदकर परिवारातील महिला उमेदवार एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्याने रांजणगाव कारेगाव जि. प. गटाकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले होते. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर या गटात बाजी मारत सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्या झाल्याने महिला कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत विजय साजरा केला तर गटातील भाजपाच्या तिन्ही विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढत फटाके फोडून गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.
Web Summary : Swati Pachundkar of BJP won the Ranjangaon-Karegaon ZP seat, defeating NCP's Jyoti Pachundkar. BJP's Sagar Devkar and Manisha Pachange also secured victories in the Panchayat Samiti elections. The Pachundkar family rivalry made this election a focal point in Shirur taluka. Celebrations erupted as BJP swept the group.
Web Summary : रांजणगाँव-करेगाँव ZP सीट पर भाजपा की स्वाति पाचुंदकर ने एनसीपी की ज्योति पाचुंदकर को हराया। भाजपा के सागर देवकर और मनीषा पांचंगे ने भी पंचायत समिति चुनाव में जीत हासिल की। पाचुंदकर परिवार की प्रतिद्वंद्विता ने इस चुनाव को शिरूर तालुका में केंद्र बना दिया। भाजपा की जीत पर जश्न मनाया गया।