Pune Weather Upadte : शिवाजीनगरचा पारा १० अंशाच्या खाली; बारामतीकरही गारठले
By श्रीकिशन काळे | Updated: November 29, 2024 19:49 IST2024-11-29T19:48:37+5:302024-11-29T19:49:23+5:30
पुणे : शहरातील थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढत असल्याने पुणेकर चांगलेच कुडकुडत आहेत. शुक्रवारी (दि. २९) शिवाजीनगरचे किमान तापमान १० ...

Pune Weather Upadte : शिवाजीनगरचा पारा १० अंशाच्या खाली; बारामतीकरही गारठले
पुणे : शहरातील थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढत असल्याने पुणेकर चांगलेच कुडकुडत आहेत. शुक्रवारी (दि. २९) शिवाजीनगरचे किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले आहे. तसेच हवेलीत ८.४, दौंड ९.१, बारामतीत ९.५ तापमानाची नोंद झाली. या हंगामात पहिल्यांदाच शिवाजीनगरचे तापमान एवढे घसरले आहे. यंदा महाबळेश्वरपेक्षाही पुणे थंड बनले आहे. कारण महाबळेश्वरमध्ये १० अंशाच्या खाली अजून तरी तापमान आलेले नाही. पुण्यात मात्र गेल्या आठवड्यापासून पारा घसरला आहे. तसेच राज्यात अहिल्यानगरमध्ये देखील किमान तापमान कमी नोंदवले जात आहे.
नैरत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीचे रूपांतर ‘फेंगल’ चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे चक्रीवादळ शनिवारी (दि. ३०) दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून जेऊर येथे शुक्रवारी हंगामातील निचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडू आणि रायलसिमा भागात काही ठिकाणी शनिवारी (दि. ३०) अतिजोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कायम असून, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमान देखील ३० अंशाच्या खाली आले आहे.
पुणे शहरातील किमान तापमान
हवेली : ८.४
दौंड : ९.१
बारामती : ९.५
शिवाजीनगर : ९.५
एनडीए : १०
हडपसर : १२.१
कोरेगाव पार्क : १४.४
वडगावशेरी : १५.९
मगरपट्टा : १६.४
लोणावळा : १७.७
बारामतीकर गारठले !
बारामती, दौंड भागामध्ये या हंगामातील सर्वात थंड दिवस शुक्रवार (दि. ३०) ठरला. कारण किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले. कमालीच्या थंडीने बारामतीकर चांगलेच गारठले आहेत.