पुणे : लेझर शोचा झगमगाट, गोविंदा पथकांनी साकारलेला मानवी मनोऱ्यांचा थरार, आकर्षक विद्युतरोषणाई, तारे-तारकांची हजेरी आणि लाखोंच्या बक्षिसांची उधळण... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी (दि. १६) दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. त्याचवेळी काही ठिकाणी डीजेमुक्त दहीहंडी साजरी करून सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
मात्र, रविवारी बेलबाग चौकात झालेल्या दहीहंडी उत्सवात प्रचंड गर्दी उसळली. या परिसरात दरवर्षी दहीहंडी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात; पण यंदा गर्दीचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. इतके लोक जमा झाले की काही ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण कसाबसा मार्ग काढताना दिसत होते.सुदैवाने कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काहींनी आयोजकांवर गर्दी नियंत्रणात अपयशी ठरल्याची टीका केली, तर काहींनी उत्सवातील उत्साह आणि उर्जा याचे कौतुक केले.