ज्येष्ठ कलावंतांकडून ‘रंग यात्रा’ ॲपच्या विरोधात आंदोलन

By श्रीकिशन काळे | Updated: March 16, 2025 16:27 IST2025-03-16T16:26:19+5:302025-03-16T16:27:24+5:30

महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला विरोध : विविध संस्था, कलावंतांकडून निषेध

pune veteran artists protest against Rang Yatra app | ज्येष्ठ कलावंतांकडून ‘रंग यात्रा’ ॲपच्या विरोधात आंदोलन

ज्येष्ठ कलावंतांकडून ‘रंग यात्रा’ ॲपच्या विरोधात आंदोलन

पुणे : शहरातील नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ या मोबाईल ॲपचा विरोध करण्यासाठी रविवारी (दि.१६) अनेक कलावंत एकत्र आले होते. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरासमोर या ॲपचा तीव्र निषेध व्यक्त करून ते रद्द करण्याची मागणी केली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भाग्यश्री देसाई आदी सहभागी झाले होते.

पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीने नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ हे मोबाइल ॲप तयार केले. पण या ऑनलाइन बुकिंग ॲपला शहरातील विविध संस्थांनी तीव्र विरोध केला. कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केले असल्याने ते आम्हाला अमान्य आहे आणि ते त्वरीत रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ कलावंतांनी केली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भाग्यश्री देसाई, बाबासाहेब पाटील, मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, समीर हम्पी, सत्यजित दांडेकर, योगेश सुपेकर, सुरेखा पुणेकर, ऋषिकेश बालगुडे, शशिकांत कोठावळे, नाना मोहिते, जतीन पांडे, मोहन कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

या ॲपमुळे नाटक व्यवस्थापक, निर्माते, कलाकार, लावणी निर्माते, व्यवस्थापक, या सर्वांच्या दृष्टीकोनातून ऑनलाइन बुकिंग अव्यवहार्य ठरणार आहे. ऑनलाइन बुकिंग करत असताना हजारोंच्या घरात जर नाट्यगृहासाठी अर्ज आले, तर कुठल्याही नाट्यगृहाच्या बॅक ऑफिसला हुशार, अनुभवी, सक्षम टीम नाही. त्यामुळे गोंधळ वाढेल, असा आरोप उपस्थितांनी केला.

सध्या नाट्यगृहांमध्ये इंटरनेट किंवा वायफायची सुविधा देखील अद्याप नाही, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बुकिंग केलेल्या संस्थांचे वाटप कसे करणार? ऑनलाइन बुकिंग करताना मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या पैशांच्या जोरावर सर्व बुकिंग अगोदरच करून ठेवतील. त्यामुळे इतर नाट्यसंस्था किंवा कलाकारांना बुकिंग करणे अवघड जाईल, अशी कलावंतांची व्यथा आहे.

पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाटकं होणं अपेक्षित आहे. पण तीन जे प्रमुख नाट्यगृहे आहेत, त्यामध्ये नाटकं न होता इतरच खासगी कार्यक्रम होत असतात. आज रंगभूमीवर ६०-७० नाटक आहेत आणि सर्वच नाटकांना या तीन रंगभूमीवर नाटक सादर करायची इच्छा असते. पुणे पालिकेने आणलेले रंगयात्रा नावाचे ॲप नाट्यगृह आरक्षणासाठी आहे. ते सर्वांना वापरता येईल. मग जर एखाद्याने संपूर्ण दिवसभर ते बूक केले तर नाटकवाल्यांनी जायचे कुठे ? याचा पालिकेेने विचार करावा. - प्रशांत दामले, ज्येष्ठ नाट्यकर्मी

Web Title: pune veteran artists protest against Rang Yatra app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.