- हिरा सरवदे
पुणे : शहरातील बाजारपेठेचा आत्मा व पुण्यासह राज्यातील ग्राहकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर अवैधपणे जागोजागी लहान-मोठी वाहने दुहेरी पद्धतीने पार्किंग केली जातात. शिवाय रस्त्यावर व पदपथांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे या रस्त्यावर दिवसभर वारंवार कोंडी होते. अवैध पद्धतीने पार्किंग होणाऱ्या वाहनांवर कारवाईची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे; परंतु ही वाहने सोडून पोलिस केवळ गल्लीबोळांमध्ये लावलेल्या दुचाकींवरच असल्याचे चित्र पाहायला मिळते.
नेहरू रस्त्यावरील संत कबीर चौक ते टिळक चौकापर्यंत (अलका) लक्ष्मी रस्ता म्हणून ओळखला जातो. याच रस्त्याला दुतर्फा विविध वस्तूंच्या बाजारपेठा आहेत. या परिसरात मिळणार नाही अशी एकही वस्तू नाही. दैनंदिन गरजेची प्रत्येक वस्तू या रस्त्याला मिळतेच. त्यामुळे हा रस्ता पुणे शहरासह देशभरातून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे व नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
मात्र, महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहराचे वैभव असलेला हा रस्ता सध्या अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आणि कचऱ्यामुळे समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. महापालिका प्रशासनाकडून सोयिस्कररीत्या या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे रस्ता व पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केला आहे. वाहतूक पोलिसांकडून रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या बेकायदा पार्किंगकडे डोळेझाक केली जाते. पोलिस केवळ दुचाकींवरच लक्ष केंद्रित करून सावज शोधण्याचे काम करतात. त्यामुळे लक्ष्मी रस्त्याचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र आहे. हे चित्र कधी बदलणार? शहराचे वैभव असलेला हा रस्ता कधी मोकळा श्वास घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकमतच्या पाहणीत काय दिसले...
- संत कबीर चौक ते उदयकांत आंदेकर चौकया दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी पार्किंग केलेल्या असतानाही चारचाकी वाहने, टेम्पो उभे केले जातात. त्यातच पदपथांवर दुचाकींना विविध पार्ट बसविणाऱ्या फिटरांचे अतिक्रमण आहे.- आंदेकर चौक ते डुल्या मारुती चौकया दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी, भंगार व्यावसायिक, मासे विक्रेते, जुनी कपडे देवाण-घेवाण करणारे आदींचे अतिक्रमण आहे.- डुल्या मारुती चौक ते बेलबाग चौकएका बाजूस दुचाकींची पार्किंग आणि दुसऱ्या बाजूला चारचाकी वाहने बेकायदा पार्किंग केली जातात. डुल्या मारुती चौकात एका चहाच्या टपरीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होतो. तसेच सतरंजवाला चौकाच्या एक काम सुरू आहे. तेथे डंपर उभा केला जातो. त्यामुळे तेथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय सोन्या मारुती चौकापासून बेलगाबपर्यंत जागोजागी माल वाहतूक टेम्पो व रस्त्याच्या कडेला पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.- बेलबाग चौक ते लिंबराज बाबा चौकया दरम्यान एका बाजूला दुचाकींचे पार्किंग आहे. तर दुसऱ्या बाजूस रिक्षा व चारचाकी वाहने डबल पद्धतीने पार्किंग करून उभी राहतात. गणपती चौकात तर दुहेरी, तिहेरी पार्किंग असते. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. दुसरीकडे दोन्ही बाजूंच्या पदपथांवर कपड्याच्या व इतर वस्तूंच्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.- लिंबराज बाबा चौक ते कुंठे चौकया दरम्यान रस्त्याच्या एका बाजूस दुचाकी आणि दुसऱ्या बाजूस स्कूलबस पार्किंग केल्या जातात. त्यातच इतर चारचाकी गाड्याही बसच्या समांतर म्हणजेच दुहेरी स्वरुपात पार्किंग केल्या जातात. शिवाय दोन्ही बाजूंच्या पदपथांवर मोठ्या प्रकरणात पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.- कुठे चौक ते उंबऱ्या गणपती चौकया दरम्यान एका बाजूस दुचाकी पार्किंग आणि दुसऱ्या बाजूस चारचाकी गाड्याचे पार्किंग असते. या दरम्यानच्या कॉमनवेल्थ बिल्डिंग पीएमपी बसथांब्याला तर पथारी व वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे ग्रासले आहे. यामुळे बस थांबवतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो.- उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौकया दरम्यान येणाऱ्या गोखले सभागृह, भानू विलास टॉकीज चौक, शेडगे विठोबा चौक या दरम्यान दुचाकींची पार्किंग असते मात्र, चारचाकी वाहने फारसी पार्किंग केली जात नाहीत. त्यामुळे यादरम्यान वाहतूक कोंडी होताना दिसत नाही. व्यावसायिक व नोकरांच्याच गाड्या दुकानांसमोरबाजारपेठेतील वाहनांच्या पार्किंगसाठी महापालिकेने विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केलेली आहे. मात्र, व्यावसायिक व त्यांचे नोकर आपल्या गाड्या दुकानासमोरच पार्किंग करतात, त्यामुळे ग्राहकांच्या गाड्या व रिक्षा, टेम्पो दुहेरी पद्धतीने पार्किंग करून उभ्या राहतात. वाहतूक पोलिसांचे लक्ष केवळ दुचाकींवरनो पार्किंग झोनमध्ये किंवा दुहेरी पार्किंगवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. अशा वाहनांना जॅमर लावणे, त्यांच्याकडून दंड वसूल करणे गरजेचे असताना पोलिसांच्या टोईंग गाड्या मुख्य रस्ता सोडून गल्ली बोळातील दुचाकी व खासगी कार शोधण्यास प्राधान्य देतात. दुचाकी उचलणाऱ्या गाड्यात तर दिवसातून दहा पंधरा वेळा बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्येच सावज शोधत फिरत असतात.