पुणे - शहरात वाहतुकीच्या कोंडीने नागरिक आधीच त्रस्त असताना, पोलीस आयुक्तांच्या भेटीमुळे वाहतुकीला अक्षरशः "लॉकडाउन" बसवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी सायंकाळी सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आगमनापूर्वीच पोलिसांनी स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारी वाहतूक बंद केली. एवढेच नव्हे तर मंदिरासमोरील चौकही पूर्णपणे बंद करण्यात आला.या अचानकच्या बंदोबस्तामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आधीच दहा दिवसांपासून सारसबाग परिसरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पोलीस आयुक्तांच्या एका "व्हीआयपी" दौऱ्यासाठी रस्ते बंद करण्याची पद्धत सर्वसामान्य पुणेकरांना चांगलीच भोवली. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान येत असल्यास सुरक्षेच्या कारणास्तव असे बंदोबस्त समजू शकतात. मात्र शहराचे पोलीस आयुक्त जेव्हा सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या अशा पद्धतीने रस्ते बंद करून फिरतात, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांनी न्याय दाद नेमकी कोणाकडे मागायची?सारसबाग परिसरात दररोज वाहतुकीमुळे नागरिकांचे हाल होत असतानाही तो प्रश्न सोडवण्याऐवजी, पोलीस आयुक्त स्वतःच "व्हीआयपी" दौऱ्यात रममाण आहेत, अशी टीका नागरिकांकडून होत आहे. आजच्या घटनेत वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काहींनी संताप व्यक्त करत "मुख्यमंत्री येणार असल्याचा आभासच निर्माण झाला होता, पण प्रत्यक्षात आले ते फक्त पोलीस आयुक्त!" अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.
Web Summary : Pune citizens faced traffic chaos as roads were blocked for the Police Commissioner's visit to Sarasbaug temple. This VIP treatment caused long queues, sparking outrage among commuters already struggling with daily congestion. Residents question prioritizing VIP movement over solving existing traffic issues.
Web Summary : पुणे में पुलिस आयुक्त के सारसबाग मंदिर दौरे के लिए सड़कें बंद होने से यातायात बाधित हुआ। इस वीआईपी व्यवहार से लंबी कतारें लगीं, जिससे पहले से ही यातायात से जूझ रहे यात्रियों में आक्रोश है। नागरिकों ने मौजूदा यातायात समस्याओं को हल करने के बजाय वीआईपी आवाजाही को प्राथमिकता देने पर सवाल उठाए।