पुणे : बिल वाढवल्याचा संशय, 75 वर्षांच्या आजोबांनी डॉक्टरवर केले चाकूनं सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 13:50 IST2017-09-19T13:41:14+5:302017-09-19T13:50:30+5:30
डॉक्टरांनी मेडिकल बिल वाढवून दिल्याच्या संशयातून एका 75 वर्षीय रुग्णानं डॉक्टरवर चक्क चाकूनं हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड फाडा येथील सिंहगड स्पेशॅलिटी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे.

पुणे : बिल वाढवल्याचा संशय, 75 वर्षांच्या आजोबांनी डॉक्टरवर केले चाकूनं सपासप वार
पुणे, दि. 19 - डॉक्टरांनी मेडिकल बिल वाढवून दिल्याच्या संशयातून एका 75 वर्षीय रुग्णानं डॉक्टरवर चक्क चाकूनं हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड फाडा येथील सिंहगड स्पेशॅलिटी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. संतोष आवारी असे जखमी झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. या घटनेत डॉक्टर संतोषच्या पोट आणि हाताला जखम झाली आहे असून तीन टाकेदेखील पडले आहेत. तर हल्ला करणा-या रुग्णाचे नाव मारुती शिवराले असे आहे.
मारुती शिवराले यांना दमाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधोपचारानं त्यांना बरे वाटत होते. पण तब्येतीच्या दृष्टीकोनातून आणखी तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात अॅडमिट करुन घेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मेडिकल बिल वाढवल्याचा संशय मारुती शिवराले यांना येत होता. यादरम्यान, डॉ. आवारी सोमवारी संध्याकाळी सिंहगड रुग्णालयात राऊंड घेण्यासाठी मारुती शिवराले यांच्याजवळ गेले असता त्यांनी डॉक्टरांवर चाकूनं सपासप वार केले.
मारुती यांना एका नातेवाईकाने डॉक्टरने बिल जास्त लावले असल्याचे सांगितल्याने त्यांनी डॉक्टरांवर चाकूनं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मारुती यांना डिस्चार्ज देण्यात आला नसल्यानं कोणतेही बिल तयार करण्यात आले नव्हते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. या प्रकरणी डॉ आवारी यांनी अभिरुची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.