पुणे: पतीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागून आत्महत्या, महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 12:50 IST2017-09-10T08:19:06+5:302017-09-10T12:50:37+5:30
एका महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सेनापती बापट रस्ता येथे घडली.

पुणे: पतीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागून आत्महत्या, महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मारली उडी
पुणे, दि. 10 - एका महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सेनापती बापट रस्ता येथे घडली. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
अश्विनी सुनील लोणकर (वय 32 सध्या रा. कसबा पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी यांचे पतीबरोबर पटत नव्हते. त्यांच्याबरोबर सातत्याने भांडणे व्हायची. त्यांचे पती हे हडपसर भागात राहातात. पतीला सोडून त्या कसबा पेठेत माहेरी राहात होत्या. काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या. शनिवारी पावणेसहाच्या सुमारास त्या सेनापती बापट रस्त्यावरील साई कँपिटल इमारतीत गेल्या. इमारतीत जाण्यापूर्वी त्यांनी रखवालदाराकडे असलेल्या वहीत नोंद केली.
डॉक्टरांची भेट घ्यायची आहे अशी नोंद त्यांनी वहीत केली होती. काही वेळानंतर त्यांनी साई कँपिटल इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
इमारतीच्या आवारात महिला पडल्याचे पाहून नागरिकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे
यांनी घटनास्थळी धाव घेतली. अश्विनी यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या मरण पावल्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भावाच्या मोबाईलवरून संपर्क साधला होता.
पोलिसांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला. तेव्हा कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चतु:श्रृंगी पोलिसांकडून रात्री उशीरा अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.