इंडिया आघाडीत रहायचे की बाहेर पडायचे? आम आदमी पक्ष संभ्रमात
By राजू इनामदार | Updated: March 15, 2025 15:55 IST2025-03-15T15:54:55+5:302025-03-15T15:55:35+5:30
देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे.

इंडिया आघाडीत रहायचे की बाहेर पडायचे? आम आदमी पक्ष संभ्रमात
पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीत जागांवरून वाद झाल्याने आम आदमी पार्टीने (आप) काँग्रेसबरोबर फारकत घेतली. आता पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्यांना काँग्रेसबरोबरच सामना करावा लागणार आहे. काँग्रेस इंडिया आघाडीचे नेतृत्व करत आहे. त्यामुळेच आता ‘आप’ समोर इंडिया आघाडीत रहायचे की जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांचे यासंदर्भातील मत दिल्लीतील पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अजमावून घेतले जात आहे.
देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. ‘आप’ नेही इंडिया आघाडीत प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी काँग्रेसपासून दुरावा ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला लांबच ठेवले. त्यामुळे त्यांच्या सत्तेला फटका बसला. काँग्रेस उमेदवारांमुळे आपचे काही उमेदवार पराभूत झाले. पंजाब विधानसभेच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. तिथे ‘आप’ सत्ताधारी आहे, तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे तिथेही ‘आप’ला काँग्रेसबरोबरच लढावे लागणार आहे.
असे असेल तर इंडिया आघाडीत रहायचे कसे? असा प्रश्न आप चे वेगवेगळ्या राज्यांमधील पदाधिकारी विचारत आहेत. आप च्या केंद्रीय नेतृत्वामध्येही याची चर्चा आहे. इंडिया आघाडीत राहून काँग्रेसचे नेतृत्व मान्य करायचे की इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असा हा प्रश्न आहे. याबाबत पक्षाकडून वेगवेगळ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना विचारणा होत आहे. त्यासाठी केंद्रातील काही पदाधिकारी राज्यांचा दौरा करत आहेत. इंडिया आघाडीबरोबर व स्वतंत्र अस्तित्व यात राजकीय फायद्यातोट्याची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की बैठका होत असल्या तरी त्या वेगळ्या कारणांसाठी होत आहेत.
आप चे संघटन वाढवण्यावर आता पक्षाने भर दिला आहे. प्रामुख्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर युवकांना एकत्र करून पक्षात सामावून घेण्यासंदर्भात चर्चा होत आहेत. महाराष्ट्रातील एकूण राजकीय गोंधळात दिल्लीतील नेतृत्वाला महाराष्ट्राकडून अपेक्षा आहेत. पक्ष बांधणी करण्यास बराच वेळ असल्याने त्यादृष्टिने बैठका होत आहेत असे किर्दत म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आप ने महाराष्ट्रात इंडिया आघाडीला, म्हणजेच महाविकास आघाडीला साथ दिली. दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाने एकही जागा न मागता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यातून विधानसभा लढवू इच्छिणारे काही कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची समजून काढण्यासाठीची दिल्लीतील काही पदाधिकारी महाराष्ट्रात येत आहेत अशी माहिती किर्दत यांनी दिली.