Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:10 PM2018-09-04T15:10:54+5:302018-09-04T15:11:15+5:30

शरद कळसकर हा शस्त्रे हाताळण्यात व बॉम्ब बनविण्यात पारंगत असल्याचा दावा मंगळवारी सीबीआयने न्यायालयात केला.

Pune: Sharad Kalaskar,an accused in terror conspiracy case, has been sent to CBI custody till September 10 | Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा

Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा

Next

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर याने दोन गोळ्या झाडल्या असून त्या त्यांना लागला. शरद कळसकर हा शस्त्रे हाताळण्यात व बॉम्ब बनविण्यात पारंगत असल्याचा दावा मंगळवारी सीबीआयने न्यायालयात केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांनी त्याला 10 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई न्यायालयाने सोमवारी शरद कळसकर याची कोठडी सीबीआयला देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सीबीआयने शरद कळसकर याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांच्या न्यायालयात हजर केले.

सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले की, शरद कळसकर याने डॉ. दाभोलकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आहेत. त्या त्यांना लागल्या, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासात त्यांचे अनेक गुन्ह्यांमध्ये संबंध असल्याचे दिसून आले आहे. शरद कळसकर हा शस्त्र चालविण्यात आणि बॉम्ब बनविण्यात पारंगत आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या सचिन अंदुरे याला राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांनी पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्या दोघांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या तिघांना समोरासमोर बसून कसून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शरद कळसकर याला 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. ढाकणे यांनी केली़ 

त्याला बचाव पक्षाचे वकील धर्मराज यांनी विरोध केला. त्यांनी सांगितले की, सचिन अंदुरे याची सीबीआयने 14 दिवसाची कोठडी घेतली होती. त्यात ते या गुन्ह्यात वापरलेले वाहन, हेल्मेट असे काहीही हस्तगत करु शकले नाही़ सीबीआय पूर्वग्रहदुषित पद्धतीने तपास करुन आता नवीन थेअरी मांडत आहे. यापूर्वी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोषारोप पत्रात त्यांनी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनी गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. आता वेगळेच सांगितले जात आहे. शरद कळसकर याच्याकडून काहीही हस्तगत करायचे नाही़ औरंगाबाद येथून पिस्तुल हस्तगत करण्यात आल्याचे सीबीआय सांगत आहे. पण, त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्याचा वेगळा गुन्हा औरंगाबादमधील पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे त्याला कोठडी देण्याची आवश्यकता नाही़ त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.



 

त्यानंतर न्यायालयाने शरद कळसकर याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी मंजूर केली. शरद कळसकर याच्या वतीने अ‍ॅड़ धर्मराज यांनी एक अर्ज न्यायालयात केला. त्यात कळसकर हा निष्पाप असून त्याने कोणासमोरही कोणताही कबुली जबाब दिलेला नाही. पोलीस कोठडीत त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करुन काही कबुल करुन घेण्याची शक्यता आहे, असे त्यात म्हटले होते. हा अर्ज दाखल करुन घ्यावा, असे अ‍ॅड़ धर्मराज यांनी न्यायालयाला विनंती केली़ त्यावर न्यायालयाने पुढे काय घडणार आहे, हे आताच कसे सांगता येईल़ त्यावर त्याच्या वकिलांनी अर्ज दाखल करुन घेण्याचा आग्रह केल्याने न्यायालयाने तो दाखल करुन घेतला.

कोठडीत असताना आरोपीला वकिलांना भेटता यावे, अशी विनंती करण्यात आली़ त्यावर न्यायालयाने दररोज ५ ते ६ दरम्यान भेटता येईल, असा आदेश दिल्याचे अ‍ॅड़ धर्मराज यांनी सांगितले.

Web Title: Pune: Sharad Kalaskar,an accused in terror conspiracy case, has been sent to CBI custody till September 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.