तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का ? न्यायाधीशांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 07:01 PM2019-08-22T19:01:28+5:302019-08-22T19:42:58+5:30

न्यायालयाच्या आवारात थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे परिपत्रक पुणे जिल्हा सत्र न्यायधीशांनी काढले हाेते. त्यानुसार आज तिघांवर कारवाई करण्यात आली.

pune session court angry on the people who spit in court premises | तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का ? न्यायाधीशांचा संतप्त सवाल

तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का ? न्यायाधीशांचा संतप्त सवाल

Next

पुणे : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना आज ताब्यात घेऊन सी. बी. आयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगूरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीशांनी तिघांना चांगलेच फैलावर घेतले. तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का ? असा संतप्त सवाल करत न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी थुंकताना काहीच कसे वाटत नाही, असे म्हणत त्यांचे कान टाेलचे. 

विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या परिसरात तबाखु, गुटखा तत्सम पदार्थ खाऊन थुंकण्यात येत असल्याने न्यायालयाच्या इमारतींचे काेपरे लाल झाले आहेत. नागरिक, पक्षकार न्यायालयाची पवित्रता राखत नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी न्यायालयीन परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले होते. 

न्यायालय आवारात अस्वच्छता करणारांवर कारवाई करता यावी यासाठी पोलीस, शिपाई आणि वकिलांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अ‍ॅड. विकास शिंदे, अ‍ॅड. दिप्ती राजपूत, पोलीस हवालदार सुनील शिंदे, श्रेयश साळवी, आशीष पवार आणि आझाद पाटील हे न्यायालयात कारवाईच्या उद्देशाने पाहणी करत असताना राम पांडुरंग मोरे (वय-६३ वर्षे रा. देहू) ही व्यक्ती न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत तंबाखू खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास आले. सदर व्यक्तीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यात आले. तसेच विशाल पंढरी शिंदे (वय-२२ रा. औसा, लातूर) आणि प्रशांत दिलीप यादव (वय-३३ वर्षे रा. चिंचवड, पुणे)  यांनाही तंबाखू आणि गुटखा खाऊन थूंकताना ताब्यात घेऊन सी बी आई विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगूरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. या व्यक्तींनी न्यायालयात अस्वच्छता केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायाधीशांनी तिघांनाही चांगलेच फैलावर घेतले. तुमच्या घरातही तुम्ही असेच थूंकता का ? अशी विचारणा केली असता तिघांनीही नाही असे उत्तर दिले. त्यावर न्यायाधीशांनी मग न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी थूंकताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ? अशी विचारणा करुन पोलिसांना तिघांवरही कारवाई करण्यास सांगितले.  मात्र ६३ वर्षे वयाच्या व्यक्तीने शारीरिक व्याधींचे कारण देत एक वेळ माफ करावे पुन्हा असे होणार नाही अशी वारंवार विनंती केल्यानंतर न्यायाधीशांनी तिनही आरोपींना सुधारण्याची संधी देत पुन्हा असे करणार नसल्याबाबत माफीनामा लिहून देण्यास सांगितले.

त्यानुसार तिनही व्यक्तींनी न्यायालयामध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे आमच्याकडून अस्वच्छता झाली आहे. त्याबद्दल आम्ही माफी मागत असून यापुढे आम्ही सार्वजनिक ठिकाणी, न्यायालयात वावरताना कोणत्याही प्रकारे अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेऊ व न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी आयुष्यात पुन्हा कोणत्याही प्रकारची अस्वच्छता करणार नसल्याचा माफीनामा लिहून दिला आहे. 

न्यायालय परिसरात अस्वच्छता केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा २ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. आज न्यायाधीशांनी न्यायालय परिसरात अस्वच्छता करणारांना माफीनामा घेऊन सुधारण्याची संधी दिली असली तरी यापुढे न्यायालयात अस्वच्छता करणारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. विकास शिंदे यांनी सांगितले.

Web Title: pune session court angry on the people who spit in court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.