ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
By नम्रता फडणीस | Updated: March 22, 2025 14:45 IST2025-03-22T14:43:57+5:302025-03-22T14:45:11+5:30
लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
पुणे - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार डॉ. केळकर यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे.
यंदा या पुरस्काराचे ३७ वे वर्ष आहे. बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा यांचा समावेश असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर दोन लाख रूपये रोख रकमेची थैली असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विजय एल. केळकर सध्या फोरम ऑफ फेडरेशन्स, ओटावा आणि इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा एक सामाजिक उपक्रम असलेल्या जनवाणीचे अध्यक्ष आहेत . ते श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट (पुट्टापर्थी, एपी)चे 2014 पासून विश्वस्त आहेत. जानेवारी २०१० पर्यंत त्यांनी वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. २००२ ते २००४ पर्यंत ते अर्थमंत्र्यांचे सल्लागार होते. भारतातील आर्थिक सुधारणांमधील त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. यापूर्वी ते १९९८-१९९९ पर्यंत भारत सरकारचे वित्त सचिव होते. १९९९ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आय एमएफ)च्या बोर्डावर भारत, बांग्लादेश, भूतान आणि श्रीलंकाचे कार्यकारी संचालक म्हणून नामांकन मिळाले आहे. देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले आहे.
लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार वीर जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.