पुणे - शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे बळी थांबताना दिसत नाहीत. औंध येथील राहुल हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने ते मागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली चिरडले गेले. हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.अधिकच्या माहितीनुसार, जगन्नाथ काशिनाथ काळे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. ते रोजप्रमाणे आपल्या दुचाकीवरून जात असताना राहुल हॉटेलसमोरील मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरली. येथील रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला आहे. चिखलामुळे नागरिकांना गाडी चालवतांना मोठ्या खड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे दुचाकी घसरली, आणि दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला. ते रस्त्यावर पडताच मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रस्ताभर पॅच-पॅच, पुण्यात मध्येच खड्डे...! त्या खड्ड्यावरून दुचाकी घसरली, दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:32 IST