पुणे : शहरातील खराडी परिसरातील एका स्टे बर्ड, अझुर सुट नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे मोठी कारवाई केली. पहाटे साडेतीनच्या सुमारास धाड टाकून सुरू असलेली पार्टी पोलिसांनी उधळून लावली गेली.
या पार्टीचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याच्या नावे गेल्या तीन दिवसांपासून हॉटेलचे ३ फ्लॅट बुक होते अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेन सदृश पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच, पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक करण्यात आली. यावेळी घटनास्थळाच्या परिसरातून तीन महिला पसार झाल्याची माहिती आहे.पत्रकार परिषदेदरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. यावेळी रूम नं. १०२ मध्ये डॉ. प्रांजल मनिष खेवलकर (४१, प्लॉट नं. ५७-५८, इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (३५, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, माळवाडी रोड), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (४१, रा. २०५, हेरीटेज पॅलेस, ओर्चिड सोसायटी, एनआयबीएम रोड, सचिन सोनाजी भोंबे (४२, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, वाघोली), कन्स्ट्रक्शन व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (२७, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, पंचतारा नगर, पांडरकर वस्ती, आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (२२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, नागरस रोड, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (२३, रा. गोदरेज ग्रीन को. म्हाळुंगे) यांच्या ताब्यातून २.७० ग्रॅम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट, दारू व बिअरच्या बॉटल्स, हुक्का फ्लेवर हे अमली पदार्थ असे ४१ लाख ३५ हजार ४०० रुपयांचेपदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले.
सातही आरोपींविरोधात खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम ८(क), २२(ब)(।।)अ, २१ (ब), २७ कोटपा ७(२), २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, शैलेश संखे, उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्यासह पथकाने केली.