पुणे : देशातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणून गौरव असलेल्या पुणे स्थानकाच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने येणा-या प्रवाशांना मोठ्या अस्वच्छतेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आता कायद्याचे शिक्षण घेणा-या तीन विद्यार्थ्यांनी स्थायी लोकअदालतीच्या माध्यमातून केली आहे. यात सेंट्रल रेल्वे, पुणे विभागाला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दुर्गंधी अस्वच्छताविषयक समस्या मांडण्यात आल्या आहेत. मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात शिकणा-या देवांगी तेलंग (वय२०), श्रृती टोपकर(२०) आणि निखिल जोगळेकर या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकाच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. दरवेळी पुणे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत प्रशासन काम करते. मात्र स्थानक परिसरातील स्वच्छता नियमित ठेवण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. यासगळ्या परिस्थितीचा अभ्यास करुन या तिन्ही विद्यार्थ्यांनी मिळुन सप्टेंबर 2018 मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ व मानवी हक्क विश्लेषक अँड. असीम सरोदे यांच्या मदतीने याचिका दाखल केली.
* विद्यार्थ्यांनी वकील होण्याची वाट न पाहता शिक्षण सुरु असताना समाजपयोगी कामे करण्यावर भर द्यावा. आणि कायदेविषयक सर्जनशीलता तयार व्हावी या उद्देशातून स्थायी लोकअदालतीच्या माध्यमातून दाद मागण्यात येते. लोकांना पैसा खर्च न करता त्यांना न्याय मिळावा याकरिता त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. याबरोबरच समाजहिताच्या अनेक केसेस यानिमित्ताने अभ्यासता येत असून त्याच्यातील बदलांकरिता कार्यरत राहणे गरजेचे आहे. - अँड . असीम सरोदे
* महाविद्यालयाच्यावतीने लिगल इन्टरव्हेंंशन नावाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. यात सार्वजनिक प्रश्नांना केंद्रभुत मानुन त्या सोडविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.पीएमपी, सार्वजनिक रस्ता, पादचारी मार्ग आणि रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता आदी समस्यांचा शोध आतापर्यंत विद्यार्थ्यांनी स्थायी लोकअदालतीत १० केसेस दाखल केल्या असून त्यापैकी दोन केसेसला न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तरुणांचा उत्साह आणि उर्जा याला बळ देण्याकरिता हा उपक्रम महत्वाचा आहे. - क्रांती देशमुख (प्राचार्य शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय) ......................