Pune Porsche Car Accident Latest Update: तब्बल वर्षभरानंतर पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मे २०२४ मध्ये झालेल्या या कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली आहे. आरोपी विरोधात प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी केली होती. त्याला न्याय मंडळाने नकार दिला. या मुलाविरोधात अल्पवयीन म्हणूनच हे प्रकरण चालवले जाईल, असेही स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाल न्याय मंडळ (JJB) कडे पुणे पोलिसांनी अर्ज केला होता. दोन जणांचा मृत्यू झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील १७ वर्षीय मुलाविरोधात प्रौढ म्हणून खटला चालवण्यात यावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
बाल न्याय मंडळाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत मागणी फेटाळली
पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलासंदर्भात पुणे पोलिसांनी जी मागणी केली होती, ती बाल न्याय मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत फेटाळली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अल्पवयीन मुलाचे कृत्य बाल न्याय कायद्यातील क्रूर गुन्ह्यात मोडत नाही, असे बाल न्याय मंडळाने म्हटले आहे. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयाला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. न्याय मंडळाने मागणी फेटाळली असून, सविस्तर आदेश अजून मिळालेला नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कारच्या धडकेत इंजिनिअर तरुण-तरुणीचा झाला होता मृत्यू
१९ मे २०२४ रोजी रात्री हा अपघात घडला होता. पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरात धडक दिली होती. यात दुचाकीवरील आयटी इंजिनिअर तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा प्रकार घडला. इतकंच नाही तर मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचेही प्रयत्न झाले.
या प्रकरणात मुलाचे वडील, आजोबा आणि त्याची आई या सगळ्यांनाही अटक झाली होती.