Tipu Sultan Birth Anniversary: टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. २४ डिसेंबर रोजी १८ व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी दिल्याची माहिती पुणेपोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. सुरुवातीला कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पुणेपोलिसांनी या मिरवणुकीला परवनागी नाकारली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. त्यानंतर उच्च न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार असल्याचे म्हटलं.
२४ डिसेंबर रोजी म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला परवानगी नाकारल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले. त्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला रॅलीला परवानगी दिल्याचे सांगितले. प्रत्येक वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने फटकारले.
"कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेणे हे पोलिसांचे काम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देण्याची वृत्ती आता बदलण्याची वेळ आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे कार्यक्षेत्र आहे. प्रत्येक वेळी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आम्हाला सांगू नका," असे खंडपीठाने म्हटलं.
टिपू सुलतान, मौलाना अबुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर एआयएमआयएमने कोर्टात धाव घेतली होती. एआयएमआयएमचे पुणे युनिटचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती. टिपू सुलतान, स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती आणि संविधान दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीला परवानगी देण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याचिकाकर्त्यांतर्फे तपन थत्ते आणि विवेक आरोटे यांनी मिरवणुकीच्या आयोजकांना रॅलीसाठी पोस्टर्स आणि गेट लावण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. त्यावर खंडपीठाने कोणत्याही व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. परंतु त्याला कायद्यानुसार घातलेल्या अटी आणि निर्बंधांचे पालन करावे लागेल, असं म्हटलं. अशा कोणत्याही मिरवणुकीसाठी कायद्यात जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. येथेही तेच लागू होईल. या प्रकरणात अपवाद का असावा?, असा सवाल खंडपीठाने केला.
"मिरवणूक काढण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. बॅनर आणि गेटचे पोलिसांना ठरवू द्या. कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे कार्यक्षेत्र असून त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तिथल्या परिस्थितीची आम्हाला जाणीव नाही. पोलिसांना ते चांगले माहीत आहे," असं खंडपीठाने म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीसाठी परवानगीची मिळाल्यानंतर खंडपीठाने दखल घेत याचिका निकाली काढली.