वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय दलाल पुणे पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 23:41 IST2018-09-15T23:38:56+5:302018-09-15T23:41:02+5:30
20 वर्षे वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सक्रीय

वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय दलाल पुणे पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : देशा परदेशातील तरुणी, महिलांना वेश्या व्यवसायात ओढून वेगवेगळ्या एजंटला पुरविणाऱ्या व गेली २० वर्षे या बेकायदेशीर धंद्यात कार्यरत असलेल्या टोनी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. इकबाल सिंग महिंद्र पाल ऊर्फ टोनी (वय ४२, रा. भैरव रेसिडन्सी, कनकिया, मीरा रोड, ठाणे) असे त्याचे नाव आहे. तो मोक्का अंतर्गत गुन्ह्यात फरारी होता. याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे आणि मनिषा झेंडे यांनी माहिती दिली.
येरवडा येथील एका पंचतारांकित हॉटेलवर गेल्या वर्षी सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून उजबेकिस्तान, रशिया येथील मुलींमार्फत वेश्या व्यवसाय होत असल्याचे उघडकीस आणले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. या प्रकरणात एकूण २४ आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याचे हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्याचा मुख्य दलाल टोनी याची पोलिसांना माहिती मिळाली होती. गेले २० दिवस एक पथक त्याचा शोध घेत होते.
अखेर शुक्रवारी रात्री त्याला ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. गेले २० वर्षे तो या व्यवसायात असून तो दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्तासह देशातील अनेक शहरे व परदेशातील एजंटची संपर्क आहे. त्यांच्या मार्फत तो वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याचे काम करीत होता. तरीही तो आतापर्यंत कोणत्याही पोलिसांच्या जाळ्यात सापडला नव्हता, असा त्याचा दावा असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, राजाराम घोगरे, किरण अब्दागिरे, निलेश पालवे यांनी केली आहे.