पुणे: लक्झरी कारने जाणाऱ्या तरुणाने पुण्यातील येरवडा परिसरातील चौकात लघुशंका केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. शनिवारी (दि. 8) येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून या तरुणाने लघुशंका केल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या घटनेनंतर राज्याभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. , याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची पुणेपोलिसांनी आज(दि.10) धिंड काढली.
सविस्तर माहिती अशी की, येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात दारुच्या नशेत गौरव आहुजा (25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) नावाच्या तरुणाने लघुशंका केली होती, तर भाग्येश ओसवाल (25, रा. मार्केट यार्ड) नावाचा मित्रही त्याच्यासोबत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत, दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता आज पोलिसांनी या दोघांची शास्त्रीनगर चौकात नेऊन धिंड काढली. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
दोघांना न्यायालयाने सुनावली कोठडीदरम्यान, गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही आज आज न्यायालयात हजर केले. यावेळी पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.