Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’
By राजू हिंगे | Updated: February 2, 2025 18:57 IST2025-02-02T18:56:27+5:302025-02-02T18:57:36+5:30
पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याने शिंदेसेनेतील प्रवेश लांबले आहेत.

Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’
पुणे : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन शिंदेसेनेने पुणे शहरात ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी उद्धवसेना आणि काँग्रेसमधील नाराजांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये शिंदेसेनेमध्ये पुणे शहरातील दोन माजी आमदार आणि काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेसेनेकडून केला जात आहे.
पुणे शहरातील शिवसेनेचे दहा नगरसवेक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन गट पडले. त्याचवेळी शिंदेसेनेमध्ये माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे गेले. ते पुढे शिंदेसेेनेचे शहर प्रमुख म्हणुन काम करत आहे. त्यानंतर उद्धवसेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुणे शहरात ताकद वाढविण्यासाठी शिंदेसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मिशन पुणेअंर्तगत शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, आमदार, मंत्रीकडून फिल्डिंग लावली जात आहे. त्यात नाराज आणि इच्छुक व्यक्तींना आपल्याकडे कसे घेता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्धवसेना आणि काँग्रेसमधील नाराजांना पक्षात घेण्यासाठी मोर्चबांधणी सुरू आहे.
पालिक निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे प्रवेश लांबले
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वाेच्च न्यायालयात याचिका आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याने शिंदेसेनेतील प्रवेश लांबले आहेत.
शिंदेसेनेमध्ये अनेक पक्षातील माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार हे प्रवेश होतील. - प्रमोदनाना भानगिरे, शहरप्रमुख, शिंदेसेना