पुणे : शहरातील ८२६ किलोमीटर लांबीचे रस्तेविना फुटपाथचे आहेत. हे फूटपाथ तयार करण्यासाठी पालिकेकडे निधीची कमतरता असते. पण, शहरात पादचारी दिन साजरा करण्याची तयारी आणि कार्यक्रमासाठी ४७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे.पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे आणि नागरिकांमध्ये शालेय मुलांमध्ये पादचाऱ्यांच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी पालिका गेल्या चार वर्षांपासून पादचारी दिन साजरा करत आहे. यंदाही ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठी खुला असतो. त्या दिवशी या रस्त्यावर विविध खेळ, पथनाट्य, गायन, वादन, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.पादचारी दिनानिमित्त रस्त्याचे डांबरीकरण, पादचारी मार्गाची दुरुस्ती, सुशोभीकरण, लोखंडी रेलिंगला रंगकाम करणे, कार्यक्रमासाठी मांडव यासह अन्य प्रकारची कामे केली जातात. पादचारी दिनासाठी ही काम गेल्या आठवड्यापासून सुरू झालेली आहेत. यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गुरुकृपा एजन्सी या ठेकेदार कंपनीने सर्वांत कमी दराने ४० लाख १२ हजार रुपयांची निविदा भरली होती. जीएसटीसह या कामाचा खर्च ४७ लाख ३५ हजार इतका होणार आहे. त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनावर पालिका करणार ४७ लाख रुपये खर्च
By राजू हिंगे | Updated: December 10, 2024 18:27 IST