धरणसाठ्याचा ‘पुणे पॅटर्न’ : जिल्ह्यातील धरणांची क्षमताच केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:06 PM2020-01-01T17:06:59+5:302020-01-01T17:16:09+5:30

गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न न करता राबविण्यात आलेला हा 'पुणे पॅटर्न ' राज्याला जलसंकटात लोटू शकतो.

'Pune Pattern' in the Pune district Dam water stock | धरणसाठ्याचा ‘पुणे पॅटर्न’ : जिल्ह्यातील धरणांची क्षमताच केली कमी

धरणसाठ्याचा ‘पुणे पॅटर्न’ : जिल्ह्यातील धरणांची क्षमताच केली कमी

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील या धरणांमध्ये गाळ राज्यातील बहुतांश धरणांना झाली तीस ते चाळीस वर्षांची

विशाल शिर्के- 
पुणे : राज्यातील बहुतांश धरणांना तीस ते चाळीस वर्षे झाली असून, काही धरणे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. वर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील या धरणांमध्ये गाळ साचत आहे. काही संघटनांनी आंदोलने करूनही रुतलेला गाळ काही जागचा हलला नाही. आता, गाळाने धरण भरत असल्याने त्याची क्षमताच कमी करण्याचा निर्णय काही धुरिणांनी घेतला आहे. गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न न करता राबविण्यात आलेला हा 'पुणे पॅटर्न ' राज्याला जलसंकटात लोटू शकतो. 
नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) धरणाच्या अभियांत्रिकीबरोबरच धरणातील साठलेल्या गाळावरदेखील अभ्यास करते. या संस्थेने घोड पाटबंधारे उपविभागातील घोड प्रकल्पाच्या जलाशयाच्या साठवण क्षमतेचा अभ्यास केला. त्यात त्यांना गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याचे आढळले. घोड धरणाची एकूण साठ्याची प्रकल्पीय क्षमता ७.७३ अब्ज घनफूट (टीएमसी) होती. गाळामुळे त्यात ४.८७ अब्ज घनफुटापर्यंत घट झाली आहे. म्हणजेच तब्बल १.७० टीएमसीने पाणीसाठा घटला आहे. दुसºया शब्दात सांगायचे झाल्यास पुणे शहराची ३५ ते ४० दिवसांची तहान भागेल इतके पाणी धरणातील गाळामुळे कमी झाले आहे. याचाच अर्थ, जवळपास एक खडकवासला (उपयुक्त साठा १.९७ टीएमसी) धरणाइतकी क्षमता कमी झाली आहे.  
हा अहवाल आल्यानंतर घोड पाटबंधारे विभागाने धरणसाठ्याच्या आकडेवारीतच बदल केला आहे. भीमा खोरे पाटबंधारे अहवालात २१ नोव्हेंबर २०१९ पूर्वी या धरणाची प्रकल्पीय पाणीसाठ्याची क्षमता ७.६३ टीएमसी होती. ती २१ नोव्हेंबरपासून ५.९७ टीएमसी करण्यात आली आहे. तसेच पूर्वीचा उपयुक्त पाणीसाठादेखील ५.४६ टीएमसीवरून ४.८७ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. त्यातही ०.५९ टीएमसीने घट झाली आहे. 
या बाबत बोलताना जलतज्ज्ञ डॉ. डी. बी. मोरे म्हणाले, राज्यात सह्याद्रीच्या दºयाखोºयात आणि मैदानी भागात धरणे आहेत. डोंगराळ भागातील धरणांच्या क्षेत्रात तुलनेने अधिक झाडी-झुडपे असल्याने कमी गाळ धरणात येतो. त्या तुलनेत मैदानी भागातील धरणांमधे गाळ साठण्याचे प्रमाण अधिक असते. घोडसह उजनी, जायकवाडी, मांजरा ही धरणे मैदानी प्रदेशातील आहेत. पानशेत, वरसगाव, कोयना ही धरणे डोंगररांगातील आहेत. या धरणातही कालामानाने गाळ साचत असतो. मेरीने दहा वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील धरणात सरासरी ८ ते दहा टक्के गाळ होता. 
..........
सरकारने गाळ भरून देण्याचा खर्च करावा 
घोड धरणातील पाण्याचा अचूक हिशेब मांडता यावा यासाठी संबंधित अधिकाºयाने धरणाची क्षमता कमी केली असेल. मात्र, हा त्यावरील उपाय असू शकत नाही. धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम दरवर्षी व्हायला हवा. विशेषत: दुष्काळी वर्षात लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याची कामे हाती घ्यायला हवीत. तसेच, धरण पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण करणे, नदीतील घळीत ठराविक अंतराने सुट्या दगडगोट्यांचे बांध घालून गाळ येण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. अनेकदा गाळ नेण्यासाठी शेतकरी उत्सुक नसतात. सरकारने जेसीबी, त्याचे डिझेल आणि गाळ भरुन देण्याचा खर्च करावा. शेतकºयांना तो वाहून नेण्याचे आवाहन करावे. - डॉ. डी. एम. मोरे, जलतज्ज्ञ
घोड धरणाचा पूर्वीचा व आजचा साठा (टीएमसीमध्ये)
पाणीसाठा प्रकार                                                 पूर्वीची                       आत्ताची
जलाशयाची एकूण क्षमता                                    ७.६३                           ५.९७
उपयुक्त पाणीसाठा क्षमता                                  ५.४६                           ४.८७
मृत पाणीसाठा क्षमता                                          १.६९                          १.१०

Web Title: 'Pune Pattern' in the Pune district Dam water stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.