पुणे : मराठा आऱ्क्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात जातीसंघर्ष तयार झाला आहे. सरकार या विषयावर स्पष्ट भूमिका न घेता भावना भडकवत आहे. ते योग्य नाही. १ मे रोजी झालेल्या महाराष्ट्रात असे वातावरण कधीही नव्हते. ते पुन्हा व्यवस्थित व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेडने ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ या जाहीर कार्यक्रमाचे रविवारी (दि.१४ सप्टेबर) रोजी सायंकाळी साडेचार वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन केले आहे अशी माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी विस्ताराने विवेचन केले. सरकारच्या सारथी तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना मदत केली जाते. याचा अर्थ सरकारला मराठा हे कुणबी आहेत व कुणबी हे मराठा आहेत हे मान्य आहे. सरकारने मराठा समाजाला आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन १० टक्के आरक्षण दिलेच आहे. आता जो अध्यादेश काढला त्यात कुणबी नोंदी सापडल्या तर ओबीसी आरक्षण मिळेल असे म्हटले आहे. मागणी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे अशी आहे. सरकारच या मराठा आरक्षण प्रश्नात संभ्रम निर्माण करत आहे अशी टीका गायकवाड यांनी केली.
सरकारच्या या धोरणामुळे महाराष्ट्रात कधी नव्हे इतका जातीय संघर्ष निर्माण झाला. संतानी सांगितलेला महाराष्ट्र धर्म समजावून सांगण्याची आज खरी गरज आहे. आम्ही काही मोठे काम करत नाही, मात्र जे आवश्यक आहे ते करतो आहोत. महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम त्यासाठीच असल्याचे गायकवाड म्हणाले. यात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश पवार, हे अभ्यासक तसेच हनुमंत पवार, बालाजी गाडे पाटील हे राजकीय कार्यकर्ते बोलतील. सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार व किशोर ढमाले यांचा कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
सध्या मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणाच्या आधारे १० टक्के आरक्षण आहे. कुणबी नोंदीनुसार ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले तर तिथे ते टिकेल का? हा प्रश्न आहे. ते घ्यायचे, त्यसाठी १० टक्के आरक्षणावर पाणी सोडायचे असा हा सर्व प्रकार आहे. याला सरकार जबाबदार आहे. सरकारने हा भांडणे लावण्याचा प्रकार सोडून सर्वच समाजासाठी शिक्षणाचा खर्च वाढवावा अशी मागणी आमची मागणी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.