२३ लाख वाहनांना जूनअखेर ‘सुरक्षा पाटी’ बसणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 09:36 IST2025-03-28T09:36:33+5:302025-03-28T09:36:43+5:30
- रोझमार्ट कपंनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांची तारेवरची कसरत

२३ लाख वाहनांना जूनअखेर ‘सुरक्षा पाटी’ बसणार का?
पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी ३० जूनपर्यंत बसविणे अनिवार्य केले आहे; परंतु नंबरप्लेट लावण्याचे काम करणाऱ्या रोझमार्ट कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय वाहनधारकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद, ढिसाळ नियोजन यामुळे पुढील तीन महिन्यांत २३ लाख वाहनांना सुरक्षा पाटी लावण्याचे काम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे काम सुरू आहे. पुण्यात एकूण २६ लाख ३३ हजार वाहनांना पाटी लावावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ २ लाख ८० हजार वाहनधारकांनी नोंदणी केले आहे. त्यात केवळ ५६ हजार २१२ वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यात आले आहे; परंतु पाटी लावण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी पाटीसाठी नोंदणी केली आहे, त्यांना वेळेवर नंबरप्लेट बसवून मिळत नाही. दुसरीकडे वाहनधारक सुरक्षा पाटी लावण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत उरलेल्या २३ लाख वाहनांना पाटी लावण्याचे काम पूर्ण होणार की, पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार? याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत.
नियमाला हरताळ :
उच्च सुरक्षा पाटी तयार झाल्यावर संबंधित वाहन मालकाच्या गाडीला फिटमेंट सेंटरचालकांकडूून पाटी लावण्यात यावी, असा नियम आहे; परंतु काही फिटमेंट चालक आरसी बुक, चेसिस क्रमांकाची कोणतीही पूर्वतपासणी न करता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सुरक्षा पाटी देण्यात येत आहे. त्यामुळे पाटी हरवली किंवा त्याचा गैरवापर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फिटमेंट सेंटर वाढविण्याकडे दुर्लक्ष
रोझमार्टा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
फिटमेंट सेंटरचालकांनी वाहनांना सुरक्षा पाटी लावणे बंधनकारक आहेत. शिवाय संबंधित वाहनांची आरसी बुक आणि चेसिस याची खात्री करून सुरक्षा प्लेट लावावी. कोणाच्या हातात नंबर प्लेट देणे, असे घडत असेल तर संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
सहकारनगर भागातील सेंटरवर ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट मिळण्याबाबत अर्ज केला होता. वेळ नसल्यामुळे मित्राला नंबर प्लेट आणण्यासाठी पाठवले होते. सेंटरवर कोणतीही चौकशी केली नाही. त्याच्या हातात नंबरप्लेट देण्यात आली. हा अतिशय गंभीर प्रकार असून, आरटीओने याकडे लक्ष दिले पाहिजे.
- अनिल मोरे, व्यावसायिक
मी ८० वर्षांचा आहे. सुरक्षा नंबरप्लेट लावण्यासाठी महिन्यापूर्वी नोंदणी केली होती. दोन दिवसांपूर्वीची तारीख आणि वेळ देण्यात आली होती. संबंधित व्यक्ती घरी येऊन कारला नंबरप्लेट लावून देतील, असे सांगितले होते. दिवसभर घरी थांबलो. मात्र, कुणीच आले नाही. फोनला प्रतिसाद मिळाला नाही.
- श्रीकांत देसाई, ज्येष्ठ नागरिक
असे आहेत आकडे :
एकूण वाहने - २६ लाख ३३ हजार
पाटीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या - २ लाख ८० हजार ७१२
बसविण्यात आलेल्या पाटी - ५६ हजार ११३