पुणे : मुलगा एक वर्षाचा झाल्यावर पत्नी पती आणि मुलाला घेऊन माहेरी गेली. कामानिमित्त पती परतला, पण पत्नी सासरी आलीच नाही. अखेर पतीने न्यायालयात धाव घेतली. पत्नीने पुन्हा सासरी परत यावे, यासाठी पुण्यातील न्यायालयात गेलेल्या पतीला अखेर दिलासा मिळाला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पत्नीने दोन महिन्यांच्या आत मुलासह सासरी परतावे, असा आदेश दिला
राजेश आणि स्मिता (दोघांचीही नावे बदलेली आहेत) यांचा विवाह २०२१ रोजी झाला. लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. या दरम्यान, वैद्यकीय अडचणीमुळे तिचा चिडचिडेपणा आणि राग वाढत होता. मुलगा एक वर्षाच्या झाल्यानंतर स्मिता ही राजेश व मुलासह पहिल्यांदा माहेरी गेली. पतीसह दोन ते तीन दिवस माहेरी आनंदात घालवल्यानंतर पती कामानिमित्त अचानक घरी परतला. त्यानंतर, माहेरी असलेल्या स्मिता हिने राजेश विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. राजेश यांनी परत येण्याची विनंती केली असता तिने नकार दिला, तसेच स्मिताला घेण्यासाठी ते सासरी गेले असता, त्यांना अपमानित करत शिवीगाळ करण्यात आली. याखेरीज त्यांकडे पैशांची व सोन्याची मागणी केली.
घरी परतल्यानंतर राजेश यांनी स्मिता हिला नांदण्यास येण्याची नोटीस पाठविली. नोटिसीनंतरही स्मिता राजेशकडे परतली नाही. त्यामुळे त्यांनी ॲड.डी.डी. धवल यांच्यामार्फत पत्नीने नांदण्यासाठी यावे, यासाठी अर्ज केला. कौटुंबिक न्यायालयातही स्मिता हजर न झाल्याने न्यायालयाने पत्नीने मुलासह आदेशापासून दोन महिन्यांच्या आत नांदण्यास जावे, असा आदेश दिला. आदेशाची प्रत पत्नीस रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
पतीने पूर्वीपासून पत्नीला नांदविण्याची भूमिका घेतली होती. पत्नी माहेरी गेल्यानंतर त्यांनी विविध प्रकारे त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी न झाल्याने त्यांनी अखेर न्यायालयाची पायरी चढली. न्यायालयानेही त्यांना तीन वर्षांचा मुलगा असून दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची गरज आहे, असे नमूद केले. त्यामुळे दोन वर्षांनतर बापलेकाची भेट होणार आहे. - ॲड.डी.डी. धवल, पतीचे वकील