दौंड - माजी आमदार रमेश थोरात यांनी आज अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर, दौंड तालुक्यातील काही पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी अजित पवारांना उद्देशून एक खुले पत्र प्रसारित केले आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यात थोरात यांच्यावर आणि पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर थेट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.पत्रात स्पष्ट विचारले आहे की, ज्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात तुम्हाला गद्दार, संपलेले असे जाहीरपणे म्हटले, अशा व्यक्तींना पक्षात प्रवेश देणे कितपत योग्य आहे? कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, स्वतःच्या पुत्रप्रेमासाठी आणि जिल्हा परिषदेतील स्वार्थासाठी काही नेते पुन्हा पुन्हा पक्ष बदलत आहेत. अशा लोकांना पुन्हा आपल्या गळ्यात माळ घालणे हे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागावर आणि पक्षशिस्तीवर प्रहार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी या नेत्यांचा उपयोग होतो, पण नंतर हेच पुन्हा दुसऱ्या पक्षात जातात. मग अशा लोकांना पुन्हा प्रवेश देऊन पक्षाची बदनामी आणि आमच्या निष्ठेची थट्टा का करता? असा प्रश्नही या पत्रातून विचारण्यात आला आहे. दरम्यान, रमेश थोरात यांनी 2019 मध्ये अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून दौंड विधानसभा निवडणूक लढवली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. याच घटनाक्रमामुळे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हा खुला पत्रप्रसंग अजित पवार यांच्या गटातील अंतर्गत असंतोषाचेही संकेत देतो. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्थानिक नेते अशा "घटकसंधी" प्रवेशांमुळे नाराज असल्याचे समजते.
गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र; काय केली मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:52 IST